जपानच्या टोकियो विमानतळावर लँडिंग करताना एका प्रवासी विमानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कोस्ट गार्डच्या एका लहान विमानाशी टक्कर झाल्याने या विमानाला आग लागल्याचे सांगितले जात आहे. यावेळी विमानात 379 प्रवासी होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.
होक्काइडोच्या उत्तरेकडील बेटावरील शिन-चितोसे विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर हानेदा विमानतळावर लँडिंग करताना धावपट्टीवरील कोस्ट गार्डच्या छोट्या विमानाशी धडक झाली. त्यानंतर विमानाने पेट घेतला. यानंतर बचाव पथकाने विमानातील सर्व 367 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढले.
विमानाने पेट घेताच प्रवासी घाबरले, धावपळ उडाली आणि एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या विमानाच्या व्हिडिओत, घाबरलेल्या प्रवाशांचा उडालेला गोंधळ दिसून येतोय.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी संबंधित एजन्सींना त्वरीत नुकसानीचा अंदाज आणि लोकांना माहिती देण्यासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेनंतर हानेदा विमानतळावरील सर्व धावपट्ट्या बंद केल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.