जपानी वृद्धांना हवाय तुरुंगवास; महागाई, एकाकीपणा दूर करण्यासाठी जाणूनबुजून करताहेत गुन्हे

जपान हा अतिप्रगत देश आहे. याच जपानला आता वृद्धत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. तेथे वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागत आहे.
जपानी वृद्धांना हवाय तुरुंगवास; महागाई, एकाकीपणा दूर करण्यासाठी जाणूनबुजून करताहेत गुन्हे
छायाचित्र सौ : Meta AI
Published on

टोकियो : जपान हा अतिप्रगत देश आहे. याच जपानला आता वृद्धत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. तेथे वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागत आहे. तसेच महागाईने त्यांचे जीणे हराम झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तेथील वृद्ध आता जाणूनबुजून गुन्हे करत आहेत. कारण गुन्हा केल्यामुळे आपल्याला तुरुंगवास होईल. त्यातून आपला एकाकीपणा कमी होईल व जेवणाची सोय होईल, अशी त्यांची मनोभूमिका आहे.

जपानमध्ये एका ८१ वर्षांच्या वृद्धेने खाण्या-पिण्याच्या व राहण्याची समस्या दूर करण्यासाठी जाणुनबुजून कायद्याचे उल्लंघन केले. कारण तिला तुरुंगात जायचे होते.

टोकियोतील तोचिगी महिला तुरुंगात बंद असलेल्या ओकियोने सांगितले की, तुरुंगात आल्यावर माझ्या जीवनात स्थिरता आली. ६० व्या वर्षी मी पहिला गुन्हा केला. जेवण चोरल्याच्या आरोपावरून मला तुरुंगात टाकले. त्यानंतर तुरुंगात मला चांगले भोजन व व्यवस्था मिळाली. तुरुंगातील वातावरण चांगले आहे. येथे प्रत्येक जण दुसऱ्याची मदत करतो. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम असते, तर तुरुंगात येण्याचा विचारच केला नसता. माझे कुटुंब माझ्यापासून वेगळे राहते. त्यामुळेच मला येथे यावे लागले, असे तिने सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, तुरुंगात येण्यापूर्वी मी माझ्या ४३ वर्षांच्या मुलासोबत राहत होते. त्यानंतर माझे व मुलाचे भांडण झाले. मी घर सोडल्यावर माझी परिस्थिती अधिकच बिकट झाली. माझ्या जीवनात आता काहीच नाही, असे मला वाटत होते. त्यानंतर मी तुरुंगात येण्याबाबत विचार केला. जपान सरकार ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना चालवते. पण, त्यातून जीवन जगणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या तुरुंगात ५०० हून अधिक महिला कैदी आहेत. त्यातील प्रत्येक चारपैकी एक कैदी वृद्ध आहे.

जपानमध्ये वृद्धांची वाढती संख्या

सध्या जपानमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर तसेच समाजजीवनावरही विपरित परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांपासून जपानमधील ज्येष्ठांनी खाणे, राहणे व एकटेपणाची समस्या दूर करण्यासाठी तुरुंगात जाण्याचा मार्ग निवडला आहे. एकटेपणातून निर्माण होणारा तणाव दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक छोटे-मोठे गुन्हे करून तुरुंगात जातात. येथे त्यांच्या भोजन व राहण्याची व्यवस्था होते.

logo
marathi.freepressjournal.in