ज्ञानवापी खटल्याच्या न्यायाधीशांना धमकी ; सुरक्षेत वाढ

रवी कुमार दिवाकर यांनी ३० दिवसांपूर्वी ज्ञानवापी येथील सर्वेक्षणाबाबत निर्णय देताना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती
ज्ञानवापी खटल्याच्या न्यायाधीशांना धमकी ; सुरक्षेत वाढ
Gyanvapi Masjid

वाराणसीतील ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी देण्यात आली आहे. ‘इस्लामिक आगाज मूव्हमेंट’च्या नावाने एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून, हे धमकीचे पत्र नोंदणीकृत पोस्टाने न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांना पाठवण्यात आले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर लखनऊ आणि वाराणसीमध्ये असलेल्या न्यायाधीशांच्या घराच्या सुरक्षेसाठी ९ अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाराणसीच्या आयुक्तांनी कँट पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेला या पत्राची चौकशी करण्यास सांगितले आहे.

न्यायाधीश रवीकुमार दिवाकर म्हणाले की, ‘इस्लामिक आगाज मूव्हमेंट, नवी दिल्लीच्या नावाने एक नोंदणीकृत पत्र माझ्याकडे आले आहे. आता न्यायाधीशही भगव्यामध्ये रंगले आहेत. हिंदू आणि त्यांच्या सर्व संघटनांना खूश करण्यासाठी हा निकाल दिला आणि दुभंगलेल्या भारतातील मुस्लिमांवर याचे खापर फोडले, असे या पत्रात म्हटले आहे.

“आजकाल न्यायिक अधिकारी वाऱ्याची दिशा बघून चालढकल करत आहेत. ज्ञानवापी मशीद संकुलाची तपासणी ही एक सामान्य प्रक्रिया आहे, असे विधान तुम्ही केले आहे. तुम्ही पण मूर्तिपूजक आहात. तुम्ही मशिदीला मंदिर घोषित कराल. मूर्तिपूजक हिंदू न्यायाधीशाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा मुस्लिम करू शकत नाही,” असे पत्रात म्हटले आहे.

दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवी कुमार दिवाकर यांनी ३० दिवसांपूर्वी ज्ञानवापी येथील सर्वेक्षणाबाबत निर्णय देताना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. या निर्णयात त्यांनी पुन्हा ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

न्यायाधीशांची सुरक्षा वाढवली

न्यायाधीशांनी डीजीपी, अतिरिक्त प्रधान सचिव गृह आणि पोलिस आयुक्त वाराणसी यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी सांगितले की, एसीजेएम रवी कुमार दिवाकर यांना नोंदणीकृत पोस्टवरून मिळालेल्या पत्राचा तपास डीसीपी वरुणा झोनकडे सोपवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in