शेर्पा कामी रिता एव्हरेस्ट सर करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडणार; आतापर्यंत ३० एव्हरेस्ट वाऱ्या केल्या

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पार करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. एव्हरेस्ट सर करण्यासाठी आर्थिक, मानसिक व शारीरिक बळ लागते.
शेर्पा कामी रिता एव्हरेस्ट सर करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडणार; आतापर्यंत ३० एव्हरेस्ट वाऱ्या केल्या
Published on

काठमांडू : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पार करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. एव्हरेस्ट सर करण्यासाठी आर्थिक, मानसिक व शारीरिक बळ लागते. त्यामुळेच एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर गिर्यारोहकाला गगन ठेंगणे वाटू लागते. या गिर्यारोहकांना वाट दाखवणाऱ्या शेर्पांचे यामध्ये मोठे योगदान असते. कामी रिता (५५) या शेर्पाने ३० वेळा एव्हरेस्ट सर केले असून आता तो स्वत:चाच विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.

कामी रिता हे रविवारी काठमांडूहून ३१ व्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाले. ते ८,८४९ मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करणार आहेत.

एव्हरेस्ट शिखर ३१ व्यांदा सर करण्यासाठी मी मानसिक, भावनिक व शारीरिकदृष्टया तयार आहे. आतापर्यंत कामी रिता यांनी ३० वेळा एव्हरेस्टवर चढाई केली. गेल्यावर्षी मे महिन्यात त्यांनी दोन वेळा हे शिखर सर केले होते.

ते म्हणाले की, माझ्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करता यावे, ही माझी इच्छा आहे. त्यानंतर पुन्हा हे शिखर सर करायचे का? याचा निर्णय घेईन. कारण एव्हरेस्टवरील वातावरणावर सर्व अवलंबून असेल.

शेर्पा कामी रिता याला सर्वात मोठी स्पर्धा शेर्पा पसंग दावा याच्याकडून आहे. त्याने आतापर्यंत २७ वेळा हे शिखर सर केले आहे.

१९९४ मध्ये कामी रिता याने पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर त्याने दरवर्षी हे शिखर सर केले. गिर्यारोहकांना सुरक्षितपणे एव्हरेस्टची यात्रा करण्याइतकी तज्ज्ञता त्याने मिळवली आहे. कामी रिता यांचे वडीलही शेर्पा होते.

अन्य शिखरेही केली सर

कामी रिताने के-२, चो ओयू, मनासलू व लोत्से आदी शिखरेही सर केली आहेत. नेपाळच्या पर्यटन विभागाने यंदा २१४ गिर्यारोहकांना एव्हरेस्टसाठी परमिट दिले आहेत. हे सर्व नेपाळच्या बाजूने शिखरावर चढणार आहेत. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी एप्रिल व मे महिना उत्तम समजला जातो. १९५३ मध्ये न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी व नेपाळी शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले होते.

logo
marathi.freepressjournal.in