
भारतीय वंशाचे काश पटेल हे अमेरिकेची सर्वोच्च तपास संस्था 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' अर्थात FBI चे संचालक म्हणून निवडले गेले आहेत. गुरुवारी (२० फेब्रुवारी) अमेरिकन सिनेटने त्यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली. अतिशय चुरशीच्या मुकाबल्यात, सिनेटने ५१-४९ मतांनी या नियुक्तीला मंजूरी दिली. सिनेटच्या मंजुरीनंतर लगेचच त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचे या नव्या जबाबदारीबद्दल आभार मानले. यासोबतच, अमेरिकेच्या शत्रूंना किंवा अमेरिकन नागरिकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
FBI वरील विश्वास पुनर्स्थापित करणार
"फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नववे संचालक म्हणून निवड होणे अभिमानास्पद आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ॲटर्नी जनरल बॉंडी यांचे त्यांच्या अढळ विश्वास आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार. जी-मेन (दुसऱ्या विश्वयुद्धातील एफबीआय एजंट) पासून ते ९/११ हल्ल्यानंतरच्या काळात आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेपर्यंत...FBI ला एक गौरवशाली परंपरा आहे. अमेरिकन जनतेला एक पारदर्शक, जबाबदार आणि न्यायप्रति समर्पित FBI हवे आहे. आपल्या न्याय व्यवस्थेतील राजकारणामुळे जनतेचा विश्वास नष्ट झाला आहे पण आजपासून असे पुन्हा होणार नाही", असे पटेल यांनी सोशल मीडियावर लिहिले.
"कुठंही गेलात तरी सोडणार नाही"
"माझे संचालक म्हणून ध्येय स्पष्ट आहे: चांगल्या पोलिसांना त्यांचे काम करू द्या—आणि FBI वरील विश्वास पुनर्स्थापित करा. FBI मध्ये काम करणाऱ्या समर्पित महिला आणि पुरूषांसह अन्य भागीदारांसोबत एकत्र काम करुन अमेरिकन जनतेला अभिमान वाटेल अशी एफबीआय पुन्हा उभारु...आणि जे लोक अमेरिकन नागरिकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतायेत—त्यांनी ही वॉर्निंग समजावी. कारण आम्ही या ग्रहाच्या (पृथ्वीच्या) कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला शोधून काढू", असे पटेल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एफबीआय संचालकपदासाठी काश पटेल यांचे नाव पुढे केले होते. गुरुवारी सिनेटच्या १०० पैकी ५१ सदस्यांनी त्यांच्या समर्थनार्थ मतदान केले, तर ४९ सदस्यांनी विरोध केला. रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स आणि लिसा मक्रोव्स्की यांनीही डेमोक्रॅटीक पक्षाची साथ देत पटेल यांच्या नियुक्तीच्या विरोधात मत दिले.
कॉलिन्स आणि मर्कोव्स्की यांची चिंता
सुसान कॉलिन्स (मेन) आणि लिसा मर्कोव्स्की (अलास्का) यांनी काश पटेल यांच्या नेमणुकीला विरोध करताना त्यांच्या ट्रम्प समर्थक राजकीय भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी पटेल यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिका एफबीआयच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीवर परिणाम करू शकतात, अशी भीती व्यक्त केली.