
मॉस्को : कझाकस्तानच्या अक्ताऊ येथे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळून त्यामध्ये ३0 हून अधिक प्रवासी जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर जवळपास ३2 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. या विमानात ६७ प्रवासी आणि पाच कर्मचारी होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वैमानिकाने तातडीने विमान उतरविण्याची सूचना दिली होती, मात्र पुढे हे विमान कोसळले.
रशियन वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अझरबैजान एअरलाईन्सच्या या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण केले होते. ग्रोज्नीमध्ये धुके पडल्याने या विमानाने मार्ग बदलला होता. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ होते. विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना व्हिडिओत दिसत आहे. हे विमान इतके तिरके झाले की ते जमिनीवर आदळेल असेच वाटत असतानाच ते कोसळले. धावपट्टीवर येण्यापूर्वीच हे विमान जमिनीवर आदळले आणि मोठा आवाज झाला. मोठ्या आवाजाने विमानातील प्रवासी किंचाळत असल्याचा आवाजही व्हायरल झालेल्या व्हिडीओत ऐकावयास येत आहे. विमान कोसळल्यावर त्याला आग लागल्याचेही दिसत आहे.
सदर घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या काही वृत्तसंस्थांनी विमानाचा अपघात हा दाट धुक्यांमुळे आणि विमान तातडीने उतरविताना झाला, असे म्हटले आहे. तर काही वृत्तसंस्थांनी विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला, असे म्हटले आहे. मात्र नेमके काय घडले ते कारण अद्याप समोर आलेले नाही. या अपघातात जे जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अझरबैजान एअरलाईन्सने म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानाचा क्रमांक जे२-८२४३ असा होता. बाकूपासून ग्रॉन्जी हवाई मार्गावर तातडीने विमान उतरविणे भाग पडले. अक्ताऊपासून तीन किमी अंतरावर विमान उतरत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ‘तास’ या रशियातील वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान मखाचाकलाच्या दिशेने वळवण्यात आले होते. विमानाचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे ५२ बंब आणि ११ बचावपथके तैनात करण्यात आली, ज्यांच्याकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.