केनियाचे लष्करप्रमुख हेलिकॉप्टर अपघातात ठार

केनियाचे लष्करप्रमुख हेलिकॉप्टर अपघातात ठार

केनियाचे लष्करप्रमुख जनरल फ्रान्सिस ओमोंडी ओगोला (वय ६१) आणि अन्य नऊ वरिष्ठ अधिकारी गुरुवारी देशाच्या दुर्गम भागात लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू पावले...

नैरोबी : केनियाचे लष्करप्रमुख जनरल फ्रान्सिस ओमोंडी ओगोला (वय ६१) आणि अन्य नऊ वरिष्ठ अधिकारी गुरुवारी देशाच्या दुर्गम भागात लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू पावले, अशी माहिती अध्यक्ष विल्यम रुटो यांनी दिली. ओगोला हे एक प्रशिक्षित लढाऊ वैमानिक होते. त्या पदावर त्यांनी प्रत्यक्ष एक वर्षच काम केले. पण त्यांच्या एकंदर लष्करी सेवेची लवकरच ४० वर्षे पूर्ण होणार होती. या घटनेनंतर अध्यक्ष विल्यम रुटो यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आणि अपघातासंबंधी माहिती जाहीर केली. त्यात त्यांनी जनरल ओगोला आणि ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निधन झाल्याचे सांगितले. अपघातातून केवळ दोन जण बचावले आहेत.

चेसेगॉन गावातून उड्डाण केल्यानंतर ओगोला यांचे हेलिकॉप्टर लगेचच खाली पडले. तिथे ओगोला आणि त्यांचे कर्मचारी लष्करी तळांची पाहणी करण्यासाठी आणि एका शाळेला भेट देण्यासाठी गेले होते. केनियाची राजधानी नैरोबीच्या वायव्येस सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर एल्गेयो माराकवेट काऊंटीमध्ये हा अपघात झाला असून त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केनियाच्या वायुसेनेने एक तपास पथक पाठवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in