ओटावा : कॅनडाच्या ब्रॅम्पडन येथील हिंदू मंदिरावर रविवारी खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी मंदिरातील भाविकांना मारहाण केली. या हल्लेखोरांच्या हातात खलिस्तानी झेंडे होते. दरम्यान, भारताने या हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जनतेने संयम ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भारताकडून निषेध
कॅनडातील हिंदू मंदिराच्या तोडफोड व मारहाणप्रकरणी भारताने चिंता व्यक्त केली. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले की, मूलतत्त्ववादी व फुटीरतावाद्यांनी हिंदू मंदिरात केलेल्या हिंसेचा आम्ही निषेध करतो. कॅनडातील मंदिरांचे संरक्षण तेथील सरकारने करावे. तसेच या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्यात यावी. भारत व कॅनडातील नागरिकांच्या सेवेसाठी आमचे राजनैतिक अधिकारी धमक्या किंवा हिंसेला घाबरणार नाहीत.
ओट्टावातील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, टोरंटोजवळच्या ब्रॅम्पटन येथील हिंदू सभा मंदिरात भारतविरोधी तत्त्वांनी हिंसा घडवली. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही चिंतित आहोत.केंद्रीय मंत्री रणवीर सिंह बिट्टू यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान ट्रुडो यांनी जनतेत फूट पाडली आहे.