

सेऊल : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या देखरेखीत लष्करी सरावादरम्यान त्यांची कन्या 'किम जू ए' हिने चक्क एक रणगाडा चालवला. सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये मुलगी चालत्या रणगाड्याच्या ड्रायव्हरच्या जागेवरून डोकावताना दिसत आहे, तर वडील किम जोंग उन तीन सैनिकांसह त्याच रणगाड्यावर बसलेले दिसत आहेत.
उत्तराधिकारी असल्याची जोरदार चर्चा
बाप-लेकीच्या या ताज्या व्हिडिओने किम जोंग उन आपल्या मुलीला स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून तयार करत असल्याच्या चर्चेला आणि शक्यतेला मोठे बळ मिळाले आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनेही गेल्या महिन्यात असा अंदाज वर्तवला होता की, किम जोंग उन तिला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत.
युद्ध तयारीचे आवाहन
किम जोंग उन यांनी रणगाडे आणि पायदळ सैनिकांच्या एका आक्रमक 'टॅक्टिकल ड्रिल'ची पाहणी केली आणि सैन्याला 'युद्धाची तयारी पूर्ण करण्याचे' आवाहन केले. दुसरीकडे उत्तराधिकारी शक्यतेवर काही तज्ज्ञ असहमत आहेत. त्यांच्या मते, किम जोंग उन यांचे वय तुलनेने अजून कमी आहे आणि उत्तर कोरियाच्या सत्ताव्यवस्थेत प्रचंड 'पुरुषप्रधान' मानसिकता असल्यामुळे मुलीला सत्तेवर बसवणे सोपे नाही. उत्तर कोरियाचा हा लष्करी सराव अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिका आणि दक्षिण कोरिया आपला वार्षिक लष्करी सराव करत आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या या सरावाकडे 'आक्रमणाची तालीम म्हणून उत्तर कोरियाकडून पाहिले जात आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून किम अशा चाचण्या करत आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढता वावर
२०२२च्या अखेरीपासून मुलगी किम जोंग उन यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या लष्करी आणि इतर कार्यक्रमांमध्ये सतत दिसू लागली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी तिला किम यांची सर्वांत लाडकी मुलगी म्हणून संबोधले आहे. नुकतेच त्यांनी एका शस्त्रास्त्र कारखान्याला भेट देऊन पिस्तूल चालवले आणि एका क्षेपणास्त्र चाचणीची पाहणीही केली. सप्टेंबरमध्ये ती वडिलांसोबत बीजिंगला गेली होती आणि नववर्षाच्या कार्यक्रमात तिने वडिलांच्या गालावर चुंबनही घेतले होते.