कुवैत अग्निकांड : भारतीयांचे मृतदेह ओळख पटल्यावर मायदेशी आणणार

कुवैतच्या मंगाफ शहरात ४९ कामगारांचा मृत्यू झाला. त्यात ४२ भारतीयांचा समावेश आहे. यातील १२ केरळ, तर ५ जण तामिळनाडूचे आहेत. मृतदेहांची ओळख पटल्यावर ते मायदेशी आणण्यात येतील, असे भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी सांगितले.
कुवैत अग्निकांड : भारतीयांचे मृतदेह ओळख पटल्यावर मायदेशी आणणार

कुवैत सिटी : कुवैतच्या मंगाफ शहरात ४९ कामगारांचा मृत्यू झाला. त्यात ४२ भारतीयांचा समावेश आहे. यातील १२ केरळ, तर ५ जण तामिळनाडूचे आहेत. मृतदेहांची ओळख पटल्यावर ते मायदेशी आणण्यात येतील, असे भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी सांगितले.

आगीत अनेकांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले आहेत. त्यांची ओळख पटवणे कठीण बनले आहे. भारताचे ‘एअरफोर्स नंबर वन’ हे विमान मृतदेहांना मायदेशी आणण्यासाठी तयारीत आहे. मृतदेहांची ओळख पटल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर मृतदेह भारतात आणले जातील. काही मृतदेह ओळखण्यापलीकडचे असल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांना तातडीने कुवैतला रवाना होण्यास सांगण्यात आले आहे. जखमींवर योग्य उपचार होत असल्याची खातरजमा करण्यासाठी आणि मृत कामगारांचे पार्थिव मायदेशात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये जॉर्ज सहकार्य करणार आहेत.

विख्यात उद्योगपती एम. ए. युसुफ अली आणि रवी पिल्लई यांनी मृतांच्या कुटुंबीयांना अनुक्रमे पाच आणि दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. नॉन रेसिडेण्ट केरळाइट्स अफेअर्स (एनओआरकेए) विभागामार्फत ही मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे केरळमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १२ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्याचे कुवैतचे आश्वासन

कुवैतमधील एका बहु मजली इमारतीला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेल्या भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन गुरुवारी कुवैतचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे ४२ भारतीय नागरिकांसह एकूण ४९ बळी घेणाऱ्या या दुर्घटनेची तातडीने चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन हे मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी कुवैतला पोहोचले असून कुवैतच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी त्यांना वरील आश्वासन दिले. मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे पार्थिव मायदेशात पाठविण्यासाठी लागणाऱ्या मदतीसह या दुर्घटनेचा तपास तातडीने करण्याचे आश्वासन कुवैतच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले आहे.

दरम्यान, सिंह यांनी गुरुवारी या दुर्घटनेत जखमी झालेल्या भारतीयांची भेट घेतली आणि त्यांना सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार येथे आलेल्या सिंह यांनी जाबर रुग्णालय, मुबारक अल कबीर रुग्णालय येथे जाऊन भारतीय रुग्णांची विचारपूस केली.

मृतांच्या कुटुंबीयांना केरळ सरकारकडून ५ लाखांची मदत

कुवैतमधील दुर्घटनेत केरळमधील ज्या कामगारांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय केरळ सरकारने गुरुवारी तातडीने बोलाविलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, जे कामगार जखमी झाले आहेत त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in