नेपाळमध्ये भूस्खलनानंतर दोन बस नदीत वाहून गेल्या; ६५ जण बेपत्ता, ७ भारतीयांचा समावेश

काठमांडू येथे जाणाऱ्या ‘ॲग्नेल’ या बसला आणि काठमांडूहून गौरला जाणाऱ्या ‘गणपती डिलक्स’ या बसला पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
नेपाळमध्ये भूस्खलनानंतर दोन बस नदीत वाहून गेल्या; ६५ जण बेपत्ता, ७ भारतीयांचा समावेश
ANI
Published on

काठमांडू : नेपाळमध्ये शुक्रवारी पहाटे झालेल्या भूस्खलनात दोन बस नदीत वाहून गेल्याने सात भारतीयांसह ६० हून अधिक प्रवासी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

चितवन जिल्ह्यातील सीमलताल परिसरातील त्रिशुली नदीत या दोन बसगाड्या वाहून गेल्या असून, त्यामधील ६५ प्रवासी बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला चितवन येथील मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी दुजोरा दिला आहे.

काठमांडू येथे जाणाऱ्या ‘ॲग्नेल’ या बसला आणि काठमांडूहून गौरला जाणाऱ्या ‘गणपती डिलक्स’ या बसला पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. काठमांडूला जाणाऱ्या बसमध्ये २१ प्रवासी, तर गौरला जाणाऱ्या बसमधे ४१ प्रवासी होते. ‘गणपती डिलक्स’मधील तीन प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, असे वृत्त ‘द काठमांडू पोस्ट’ने दिले आहे.

बेपत्ता झालेल्या सात भारतीयांची नावे संतोष ठाकूर, सुरेंद्र साह, अदित मियान, सुनील, शाहनावाझ आलम आणि अन्सारी अशी आहेत. अन्य एका भारतीयाचे नाव कळू शकलेले नाही.

नेपाळचे मावळते पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून शोध आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

नेपाळमध्ये विमान धावपट्टीवरून घसरले, ५९ प्रवासी सुखरूप

काठमांडू : ‘बुद्धा एअर’ या नेपाळच्या खासगी विमान कंपनीचे विमान गुरुवारी रात्री लुंबिनी प्रांतातील सिद्धार्थनगर येथील गौतम बुद्ध विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. या विमानात ५९ प्रवासी होते. सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाला नाही. ‘बुद्धा एअर’ ८०५ क्रमांकाचे विमान विमानतळावर उतरताना चिखलात रुतून घसरले, असे वृत्त ‘काठमांडू पोस्ट’ या वर्तमानपत्राने पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे. या घटनेनंतर विमानातील चार कर्मचाऱ्यांसह ५९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमान धावपट्टीवरच असल्याने विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in