नवी दिल्ली : बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याची ग्वाही दिली. मोदी यांनीही, लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करणाऱ्या पुरोगामी बांगलादेशला भारताचा पाठिंबा असल्याचे ‘एक्स’वरून जाहीर केले. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मोदी आणि युनुस यांच्यात प्रथमच संभाषण झाले.
दोघांमध्ये बांगलादेशातील स्थितीबाबत चर्चा झाली, बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याची ग्वाही युनुस यांनी दिली, तर पुरोगामी आणि लोकशाही मूल्यांचे जतन करणाऱ्या बांगलादेशाला भारताचा पाठिंबा राहील. विविध विकासकामांसाठी पुढाकार घेऊन भारत बांगलादेशातील जनतेला पाठिंबा देण्यास बांधील आहे, असे मोदी यांनी युनुस यांना सांगितल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.