
जेरुसलेम : इस्रायलच्या भूदलाने गाझा पट्टीत मर्यादित प्रमाणावर हल्ले केले आहेत. हमासने हे हल्ले परतवून लावल्याचा दावा केला आहे. हल्ल्यात इस्रायलचा एक सैनिक ठार झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत.
हमासने दोन आठवड्यांपूर्वी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांनतर इस्रायलने गाझा पट्टीची नाकाबंदी करून मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले सुरू केले. गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करण्यास फर्मावले. त्यानंतर गाझा पट्टीवरील इस्रायलच्या जमिनीवरून आक्रमणाबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. पण अद्याप हा हल्ला झाला नाही. तत्पूर्वी रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे इस्रायलने गाझा पट्टीतील खान युनूस शहराच्या परिसरात मर्यादित प्रमाणावर जमिनी हल्ले केले आहेत. हमासच्या ताब्यातील ओलिसांबद्दल माहिती काढण्यासाठी हा हल्ला केल्याचे इस्रायलने म्हटले आहे, तर हमासने हा हल्ला परतवून लावल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात हमासने डागलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या माऱ्यात इस्रायलचा एक सैनिक ठार झाला आणि अन्य तीन सैनिक जखमी झाले. भूदलाच्या मोठ्या आक्रमणापूर्वीची ही चाचपणी करणारी कारवाई होती, असा कयास लावला जात आहे.
दरम्यान, गाझा पट्टीजवळील इजिप्तच्या सीमेवरील चौकीवर इस्रायलच्या रणगाड्यांकडून नजरचुकीने हल्ला झाल्याचे इस्रायली सेनादलांनी म्हटले आहे. त्यात इजिप्तचे सात सैनिक जखमी झाले आहेत.
गाझात एका दिवसात ४०० ठार
इस्रायलचे गाजा पट्टीवरील हवाई हल्ले सुरूच आहेत. गेल्या २४ तासांत इस्रायलने गाझा पट्टीवर ३०० हून अधिक हवाई हल्ले केले आहेत. रविवारच्या एका दिवसात इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ४०० नागरिक मारले गेल्याचा दावा पॅलेस्टाईनच्या आरोग्य खात्याने केला आहे. गेल्या १५ दिवसांत गाझा पट्टीत ५,०८७ जण मारले गेले असून त्यातील ४० टक्के बालके आहेत.