नवी दिल्ली : बांगलादेशचे सेंट मार्टिन हे निसर्गसंपन्न बेट अमेरिकेला हवे होते. मी या बेटाची मालकी अमेरिकेला दिली असती तर माझी सत्ता कायम राहिली असती. कारण अमेरिकेला पश्चिम बंगालच्या उपसागरावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी हे बेट हवे होते. हे बेट अमेरिकेला देण्यास नकार दिल्याने मी सत्ता गमावली, असे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे.
बांगलादेशातून निघण्यापूर्वी शेख हसीना या देशाला संबोधित करणार होत्या. या भाषणाची माहिती त्यांनी आपल्या निकटवर्तीयांना दिली. तसेच मी बांगलादेशात ‘पुन्हा येईन’, असे त्यांनी सांगितले.
बांगलादेशातील सत्तापरिवर्तनाचा कट अमेरिकेने रचला. मला संधी मिळाली असती तर हे मी दिल्याने सत्ता गमावली. माझ्या अखेरच्या भाषणात बोलले असते. पण, आंदोलक माझ्या घराच्या बाहेर पोहचले होते. तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्काळ तेथून जाण्याचा सल्ला मला दिला, असे हसीना म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, मला मृतदेहांचा खच पाहायचा नव्हता. त्यामुळेच मी राजीनामा दिला. विरोधक विद्यार्थ्यांचा बळी देऊन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. मी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला दिले असते तर सत्तेवर कायम राहू शकले असते. त्यामुळे नागरिकांनी कट्टरवाद्यांच्या नादी लागू नये, असे आवाहन त्यांनी बांगलादेशी नागरिकांना केले.
मी देशात राहिले असते तर अधिक जणांचे बळी गेले असते. अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असते. त्यामुळेच देश सोडण्याचा कठीण निर्णय मी घेतला, असे त्या म्हणाल्या.