

मलेशियात क्वालालंपूर येथे आज(१७ ऑगस्ट) गुरुवारी एका चार्टर विमानाच एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात १० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विमानात सहा प्रवासी आणि दोन फ्लाइट क्रू मेंबर असल्याचं मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या निवेदनाच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे. लँगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हे विमान सुलतान अब्दुल अजीज शाह विमानतळाकडे जात होते.
प्राप्त माहितीनुसार, विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी २.४७ वाजता सुबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरशी पहिला संपर्क साधला. त्याला लँडिंग क्लिअरन्ससाठी दुपारी २.४८ वाजेची वेळ देण्यात आली होती. यानंतर दुपारी २.५१ वाजता टॉवरमधील कर्मचाऱ्यांना काही अंतरावरुन धूर निघताना दिसला. या विमानातून 'मे डे' चा एकही कॉल आला नाही.
सेलंगोरचे पोलीस प्रमुख हुसेन उमर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कार आणि मोटारसायकलला धडकले. या दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी एक जण होता. फॉरेन्सीक कर्मचारी या दुर्घटनास्थळावरुन अवशेष गोळा करत आहेत. या अवशेषांना पोस्टमॉर्टम तपासणीसाटी आणि ओळख प्रक्रियेसाठी क्लांग येथील अँपुआ रहीमा पॉस्पिटलमध्ये आणलं जाईल. तसंच वाहतून मंत्रालयाकडून या घटनेची चौकशी केली जाणार आहे.