भारत आणि पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका महागात; मालदीव सरकारकडून तिन्ही मंत्री निलंबित
भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याबद्दल मालदीव सरकारने मरियम शिउन, मलशा शरीफ आणि महझूम मजीद या तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. गुरुवारी मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांनी या भेटीचे फोटो शेअर करत लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. यानंतर भारतीय आणि मालदीवच्या युजर्समध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू झाले होते. मोदी यांनी केलेल्या पोस्टनंतर मरियम शिउन आणि मलशा शरीफ मंत्र्यांनी भारतावर आणि पंतप्रधानांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिउन यांनी मोदींना ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे संबोधले होते. नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर तासाभराने मरियम शिउन, मलशा शरीफ आणि महझूम मजीद या मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रअध्यक्षांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने तिन्ही मंत्र्यांच्या निलंबनाची पुष्टी केली आहे परंतु, त्यांनी याबाबतचा अधिक तपशील दिला नाही.
मालदीव सरकारने जारी केले होते निवदेन-
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग लोकशाही पद्धतीने आणि जबाबदारीने केला पाहिजे. द्वेष पसरवणारे, नकारात्मक वक्तव्य करण्यात येऊ नयेत. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सहयोगी देशांशी संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्यावी. आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अधिकारी किंवा मंत्री याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे मालदीव सरकारने आपल्या निवेदनात म्हटले होते. तसेच,हे वक्तव्य मंत्र्यांचे व्यक्तिगत असून त्याचा मालदीव सरकारशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
मोदी यांनी गुरुवारी लक्षद्वीप दौरा केला. त्यांनी या दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. पर्यटनासाठी ही उत्तम जागा असल्याचे त्यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट मालदीवच्या मंत्र्याला चांगलीच झोंबली होती. मालदीवच्या युवा सशक्तीकरण मंत्री मरियम शिउन यांनी यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच, मलशा शरीफ आणि युवा मंत्रालयातील आणखी एक मंत्री महझूम मजीद यांनी देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती.