ट्रम्प यांचे स्वप्न भंगले! व्हेनेझुएलाच्या मारिया मचाडो यांना शांततेचे नोबेल

ट्रम्प यांचे स्वप्न भंगले! व्हेनेझुएलाच्या मारिया मचाडो यांना शांततेचे नोबेल

नोबेल पुरस्कारासाठी डोळे लावून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वप्नभंग झाला आहे. कारण व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शुक्रवारी नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Published on

ऑस्लो : नोबेल पुरस्कारासाठी डोळे लावून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वप्नभंग झाला आहे. कारण व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शुक्रवारी नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘अंधार वाढत असताना लोकशाहीची ज्योत तेजस्वी ठेवणारी महिला’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. जगाच्या अनेक भागात हुकूमशाही वाढत असून लोकशाही कमकुवत होत आहे. या संकटाच्या काळात मारियो मचाडो यांच्या लढ्यामुळे नवी आशा जागृत होते, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

नोबेल समितीने सांगितले की, कायम शांततेसाठी लोकशाही आवश्यक आहे. जेव्हा सत्ता भीती, हिंसेच्या माध्यमातून जनतेवर दबाव टाकायला लागते तेव्हा अशा हिंमतबाज लोकांचा सन्मान करणे गरजेचे ठरते.

राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारविरोधातील एकेकाळी विभागलेल्या विरोधी गटांना एकत्र आणणारी ‘महत्त्वाची, एकात्मिक कार्य करणारी व्यक्ती’ म्हणून मचाडो यांचे कौतुक करण्यात आले, असे नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष योर्गेन व्हात्ने फ्रिडनेस यांनी सांगितले.

या आठवड्यात ५८ वर्षांच्या मचाडो या मादुरो यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास सज्ज होत्या, मात्र सरकारने त्यांना अपात्र ठरवले. त्यानंतर कधीही निवडणूक न लढवलेले गोनझालेझ यांनी त्यांची जागा घेतली. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात दडपशाही, अटक आणि मानवाधिकारांचे उल्लंघन झाले.

‘गेल्या वर्षभरात मचाडो यांना लपून राहावे लागले. त्यांच्या जीवाला गंभीर धोके असतानाही त्या देशातच राहिल्या आणि त्यांच्या या धैर्याने लाखो लोकांना प्रेरणा दिली. जेव्हा हुकूमशहा सत्तेत येतात, तेव्हा स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्यांचा गौरव करणे अत्यंत आवश्यक असते,’ असे फ्रिडनेस म्हणाले.

मचाडो या जानेवारीपासून लपून आहेत आणि सार्वजनिकरीत्या दिसल्या नाहीत. निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेनंतर गोनझालेझ यांच्यावर अटक वॉरंट निघाले आणि ते स्पेनमध्ये निर्वासित झाले, जिथे त्यांना आश्रय देण्यात आला.

दरम्यान, गाझा युद्धबंदी योजनेच्या मंजुरीनंतर शांततेचे नोबेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मिळेल, अशी अटकळ व्यक्त होत होती. मात्र, नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष योर्गेन व्हात्ने फ्रिडनेस म्हणाले, ‘या समितीने अनेक वर्षे विविध मोहिमा, माध्यमांचे लक्ष आणि हजारो शिफारसी पाहिल्या आहेत. पण आमचे निर्णय केवळ अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेवर आणि कार्यावर आधारित असतात.’

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार समर्पित - मचाडो

‘मला धक्का बसलाय. माझा विश्वासच बसत नाही, असे नोबेल जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मचाडो म्हणाल्या. दरम्यान, शांततेचा नोबेल पुरस्कारप्राप्त मारिया कोरिना मचाडो यांनी आपला पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला आहे. मचाडो म्हणाल्या की, व्हेनेझुएलातील लढ्यात ट्रम्प यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार. आमचे अध्यक्ष निकोलस मादुरोच्या हुकुमशाहीशी लढताना आमचे सहकारी अमेरिकेची मदत नेहमीच महत्त्वाची मानतात.

एका स्त्रीच्या संघर्षाचा सन्मान

स्पेनमध्ये निर्वासित असलेले मचाडो यांचे सहकारी एडमुंडो गोनझालेझ यांनी फोनवर मचाडो यांच्याशी बोलतानाचा लहान व्हिडीओ पोस्ट केला. गोनझालेझ यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘हे पारितोषिक आपल्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी दीर्घ संघर्ष करणाऱ्या एका स्त्री आणि संपूर्ण जनतेच्या प्रयत्नांचा योग्य सन्मान आहे.’

विरोधकांवर कारवाई

मादुरो समर्थकांनी भरलेल्या राष्ट्रीय निवडणूक परिषदेने विश्वसनीय पुराव्यांअभावी मादुरो यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर दडपशाही आणखी वाढली आहे. या निकालांनंतर देशभरात निदर्शने झाली, ही निदर्शने दडपण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला. त्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामुळे अर्जेंटिनासह काही देशांनी व्हेनेझुएलाशी राजनैतिक संबंध तोडले.

व्हाईट हाऊसची नोबेल समितीवर आगपाखड

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी 'एक्स'वर लिहिले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यापुढेही जगभरात शांततेचे करार घडवतील, युद्ध संपवतील आणि जीव वाचवतील. नोबेल निवड समितीने यावेळी शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले आहे, असा आरोप व्हाईट हाऊसने केला.

logo
marathi.freepressjournal.in