
इस्लामाबाद : पाकच्या डेरा गाजी खान जिल्ह्यात अणू प्रकल्पाजवळ भीषण स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटाचे आवाज ५० ते ६० किमीपर्यंत ऐकू गेले. अणू केंद्राजवळ स्फोट झाल्याने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या स्फोटाचे कारण समजू शकले नाही.
तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये हे अणू केंद्र उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या अणू केंद्राची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे.
युरेनियमचे मोठे साठे
डेरा गाजी या भागात युरेनियमचे मोठे साठे आहेत. या शहरात हे अणू केंद्र पाकिस्तानातील सर्वात मोठे केंद्र आहे. या ठिकाणी युरेनियमचे उत्खनन व शुद्धीकरणाचे काम चालते. येथे युरेनियमचा एक प्रकल्प आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराची कडक सुरक्षा या भागात असते.
पाकिस्तानी लोकांनी सांगितले की, हा स्फोट अणू केंद्राच्या आत झाला आहे, तर पाकिस्तानी मीडियाने त्याचे खंडन केले. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान हा स्फोट लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या स्फोटानंतर अनेक गाड्या जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे डेरा गाझी खान हा भागात टीटीपी दहशतवाद्यांचा गड मानला जातो.
पाकने आपल्या अणुबॉम्बची संख्या वाढवण्यासाठी डेरा गाझी खान येथील अणू केंद्राची क्षमता वाढवली आहे. पाकच्या अणुबॉम्बला लागणारे युरेनियम व युरेनियम धातू हा येथेच बनवला जातो. पाक वेगाने अणुबॉम्ब बनवत आहे. पाककडे सध्या १७० अणुबॉम्ब आहेत. येत्या काही वर्षांत हाच आकडा २०० च्यावर जाण्याची शक्यता आहे.