

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये फुटबॉलच्या सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुआनाजुआतो राज्यातीतील सलामांका शहरात घडली. या घटनेमुळे सामन्यादरम्यान गोंधळ उडाला. सर्वजण सैरावैरा पळू लागले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. घटनास्थळावर १० जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या गोळीबारात जखमी झालेल्या १२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
सलामांकाचे महापौर सेझर प्रीटो यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, जखमींमध्ये एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेमुळे शहराला खूप दुःख झाले आहे. हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रपती क्लॉडिया शीनबॉम यांना त्वरित मदत करण्याचे आवाहन केले आहे. दुर्दैवाने काही गुन्हेगारी गट अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यश येणार नाही. पोलिसांनी या गोळीबाराच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ग्वानाजुआटोमध्ये मेक्सिकोमध्ये सर्वाधिक हत्या झाल्या होत्या. स्थानिक टोळी सांता रोसा डी लिमा आणि शक्तिशाली जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल यांच्यात हिंसक संघर्ष सुरू आहेत. मेक्सिकन सरकारच्या मते, २०२५ मध्ये देशभरात हत्येचा दर २०१६ नंतर सर्वात कमी होता, दर १००,००० लोकांमागे १७.५ हत्या झाल्या.