
युरोपीय देश ग्रीसच्या समुद्रात बुधवारी एक प्रवासी जहाज बुडाल्याने ७९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पण या अपघातात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा अपघात अलीकडच्या काळातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत अनेक जण बेपत्ता असल्याचाही अंदाज आहे. हे जहाज बुडाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. युरोपियन बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ७५० प्रवासी होते. मात्र या जहाजातील एकूण प्रवासी किती हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत केवळ अंदाज बांधले जात आहेत. तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 104 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
हे जहाज लिबियातून निघाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील अनेक प्रवासी इजिप्त, सीरिया आणि पाकिस्तानमधील होते. दक्षिण ग्रीसमधील पायलोस शहरापासून सुमारे 80 किमी अंतरावर प्रवासी जहाज बुडाले. जहाज बुडाल्यानंतर तटरक्षक दल, नौदलाचे जहाज आणि लष्कराचे विमान मदत करत आहेत. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबवावे लागले. मात्र गुरुवारी सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू झाले आहे. तसेच या बचाव मोहिमेत आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात त्यांना यश आल्याचे प्रशासनाकडून बोलले जात आहे. या आपत्तीतून वाचलेल्यांना पायलोसजवळील कलामाता या ग्रीक बंदरात नेले जात आहे. येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे ग्रीसमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.