कोट्यवधींची उधळण कोणावर?आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी आज दुबईत मिनी-ऑक्शन: ३३३ खेळाडू रिंगणात; उपलब्ध जागा फक्त ७७

यंदा एकंदर १,११६ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १० संघमालकांनी ३३३ खेळाडूंची नावे अंतिम यादीसाठी पात्र ठरवली.
कोट्यवधींची उधळण कोणावर?आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी आज दुबईत मिनी-ऑक्शन: ३३३ खेळाडू रिंगणात; उपलब्ध जागा फक्त ७७
PM

दुबई : इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन २०२३मध्ये इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पंजाब किंग्जने त्याला विक्रमी १८.५० कोटी रुपयांत खरेदी केले होते. यंदा एखादा खेळाडू हा टप्पा ओलांडून १९ कोटींचा मानकरी ठरणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी मंगळवारी दुबई येथे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार असून ३३३ खेळाडूंपैकी फक्त ७७ जणांवरच १० संघमालकांकडून बोली लावण्यात येणार आहे.

दुबईतील कोका कोला एरिना येथे आयपीएलचे मिनी-ऑक्शन होणार असून स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताबाहेर खेळाडूंची लिलाव प्रकिया होईल. तसेच यावेळी मल्लिका सागरच्या रूपात प्रथमच एखादी महिला पुरुषांच्या आयपीएलसाठी ऑक्शरनरची भूमिका बजावणार आहे. मल्लिकाने काही दिवसांपूर्वीच मुंबईत महिलांच्या आयपीएलमध्ये म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगसाठीही ऑक्शनरची जबाबदारी पार पाडली. १० संघमालकांपैकी गुजरात टायटन्सकडे सर्वाधिक ३८.१५ कोटी रक्कम शिल्लक आहे, तर लखनऊ सुपर जायंट्सकडे सर्वात कमी म्हणजेच १३.१५ कोटी रुपये बाकी आहेत.

यंदा एकंदर १,११६ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १० संघमालकांनी ३३३ खेळाडूंची नावे अंतिम यादीसाठी पात्र ठरवली. यामध्ये २१४ भारतीय व ११९ विदेशी खेळाडू आहेत. ३३३पैकी ११६ खेळाडू आंतरराष्ट्रीय अनुभवाचे आहेत. तसेच १० संघांकडे उपलब्ध असलेल्या ७७ जागांपैकी ३० जागा या विदेशी खेळाडूंच्या आहेत. त्यामुळे एकूणच प्रत्येक संघाला खेळाडूवर बोली लावताना पैशांचे गणित पडताळून पाहावे लागणार आहे.

मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे १० संघ मार्चपासून रंगणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होतील. प्रत्येक संघाला किमान २५ खेळाडू संघात घेण्याची अनुमती आहे.

 हेझलवूड एप्रिलमध्ये अनुपलब्ध

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडची पत्नी चेरिना एप्रिलमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणे अपेक्षित आहे. त्यामुळे हेझलवूड थेट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध असेल. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध आहेत. बांगलादेशच्या तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम यांनी लिलावातून ऐनवेळी नाव काढले आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स, जो रूट, जोफ्रा आर्चर या त्रिकुटाने आधीच आयपीएलच्या आगामी हंगात न खेळण्याचे ठरवले आहे.

 या विदेशी खेळाडूंवर लक्ष

मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : मूळ किंमत २ कोटी

रचिन रवींद्र (न्यूझीलंड) : मूळ किंमत ५० लाख

जेराल्ड कोएट्झे (द. आफ्रिका) : मूळ किंमत २ कोटी

ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) : मूळ किंमत २ कोटी

जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) : मूळ किंमत २ कोटी

वानिंदू हसरंगा (श्रीलंका) : मूळ किंमत १.५० कोटी

या देशी खेळाडूंवर नजरा

शाहरूख खान : धडाकेबाज फलंदाज

शार्दूल ठाकूर : फलंदाज, मध्यमगती गोलंदाज

हर्षल पटेल : फलंदाज, मध्यमगती गोलंदाज

कार्तिक त्यागी : वेगवान गोलंदाज

अर्शीन कुलकर्णी : युवा सलामीवीर

मुशीर खान : फलंदाज, डावखुरा फिरकीपटू

 संघाकडे उपलब्ध असलेली रक्कम

संघ                  शिल्लक रक्कम         खेळाडूंची जागा (विदेशी)

मुंबई                १७.७५ कोटी               ८(४)

चेन्नई             ३१.४ कोटी                  ६(३)

दिल्ली             २८.९५ कोटी               ९(४)

बंगळुरू           २३.२५ कोटी   ६(३)

गुजरात           ३८.१५ कोटी   ८(२)

कोलकाता      ३२.७ कोटी      १२(४)

राजस्थान       १४.५ कोटी      ८(३)

पंजाब              २९.१ कोटी      ८(२)

हैदराबाद         ३४ कोटी         ६(३)

लखनऊ          १३.१५ कोटी   ६(२)

 वेळ : दुपारी १ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमा अॅप

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in