प्रतिनिधी - अरित्रा सिंघा
नवी दिल्ली : बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार व आंदोलन सुरू आहे. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर मोठे अत्याचार सुरू आहेत. त्याचे पडसाद भारतात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सजीब वाजेद जॉय यांनी ‘अवामी लीग’च्या राज्यातच अल्पसंख्यांक सुरक्षित राहू शकतात, अशी ग्वाही दिली.
बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असून त्याचे व्हिडीओ फिरत आहेत, या प्रश्नावर सजीब वाजेद जॉय म्हणाले की, केवळ अवामी लीगचे सरकारच बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकते.
तुम्ही यापूर्वी राजकारणापासून दूर होतात. पण, सध्याच्या काळात तुमची भूमिका काय आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की, मी कायमच राजकारणापासून दूर राहिलो आहे. आता माझ्या आजोबांच्या स्मारकांचा अपमान केल्याने मी संतापलो आहे. माझ्या कुटुंबातील मारेकऱ्यांनीही आमचे घर कधीच उद्ध्वस्त केले नाही. आता त्यांचा वारसा वाचवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करायला मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
शेख हसीना पुन्हा ढाक्यात दिसणार का? यावर ते म्हणाले की, त्या नक्कीच मायदेशी परततील, पण केव्हा हे सांगू शकत नाही. त्यांची पंतप्रधानपदाची मुदत संपल्यानंतर त्या निवृत्त होणार होत्या. त्यानंतर त्या मूळगावी जाऊन राहणार होत्या.
शेख हसीना व त्यांच्या सरकारविरोधात मोठा कट रचला होता का? या प्रश्नावर ते म्हणाले की, नक्कीच. आमच्या सरकारने बांगलादेशातील सर्व दहशतवादी कारवाया थांबवल्या आहेत. या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे पाठबळ होते. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही ‘आयएसआय’चे सर्व मनसुबे उधळून लावले. सध्या बांगलादेशातील आंदोलकांकडे शस्त्रास्त्रे पाहून आम्हाला धक्का बसला आहे. त्यांना ते कुठून मिळाले. बांगलादेशच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या, असा प्रश्न त्यांनी केला.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार संवैधानिक असल्याचे तुम्हाला वाटते का? यावर ते म्हणाले की, नाही. तत्काळ सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर निर्णय दिला. सध्याची परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला असावा. तथापि, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व कायदेशीर बाबी तपासूनच निकाल दिले होते. संसद विसर्जित झाल्यानंतर ९० दिवसांत निवडणूक झाली पाहिजे.
बांगलादेशात सध्या हडेलहप्पीचा कारभार
आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा मागितला हे तुम्हाला पटले का? यावर ते म्हणाले, नाही. देशात हडेलहप्पीचा कारभार सुरू आहे. हंगामी सरकारने जमावबंदीचा निर्णय घेतला आहे.
अवामी लीग पुन्हा भरारी घेईल!
तुम्ही अवामी लीग पक्षाचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर सजीब जॉय म्हणाले की, हा निर्णय पक्ष घेईल. अवामी लीगच्या नेते व कार्यकर्त्यांना तुम्ही सध्या काय संदेश द्याल, यावर त्यांनी सांगितले की, तुम्ही आशा सोडू नका. आपला पक्ष बांगलादेशातील सर्वात जुना व मोठा पक्ष आहे. आपण अनेक संकटांना यापूर्वीही तोंड दिले आहे. १९७५ चा उठाव तसेच लष्करी राजवट अनुभवली आहे. त्यातूनही पक्षाने पुन्हा भरारी घेतली.