क्षेपणास्त्र दिसणार प्रवासी विमानासारखे ;चीनचे नवे संशोधन : युद्धात शत्रूला चकवा देण्यासाठी नामी युक्ती

चीनने बनवलेले हे रडार रिफ्लेक्टर्स गरजेनुसार त्यांचा आकार बदलू शकतात किंवा त्यांचे काम बंद किंवा चालू करू शकतात.
क्षेपणास्त्र दिसणार प्रवासी विमानासारखे ;चीनचे नवे संशोधन : युद्धात शत्रूला चकवा देण्यासाठी नामी युक्ती
PM
Published on

बीजिंग : चीनने विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारवर एखाद्या प्रवासी विमानासारखे दिसू शकते. त्यामुळे युद्धात शत्रूला चकवा देणे शक्य होणार आहे. त्यातून शत्रूच्या सेनानींमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

आपल्या भूप्रदेशावर चाल करून येणारी शत्रूची लढाऊ विमाने, होलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे आदी शस्त्रास्त्रे रडारच्या मदतीने शोधता येतात. त्यातून हल्ल्याची आगाऊ सूचना मिळून त्यावर उपाय योजणे शक्य होते. म्हणूनच विविध देश रडारला चकवा देणारे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. रडार रेडिओ किंवा अन्य लहरी हवेत सोडते. त्या विविध वस्तूंवर आदळून परत आल्या की रडारच्या स्क्रीनवर त्यांची प्रतिमा उमटते आणि त्या वस्तूचे आपल्यापासूनचे अंतरही समजू शकते. हे तंत्रज्ञान युद्धात खूप उपयोगी ठरते. पण, समजा विमाने किंवा क्षेपणास्त्रांवर आदळून लहरी परत गेल्याच नाहीत, त्या विमानात शोषून घेतल्या गेल्या किंवा विशिष्ट प्रकारे परावर्तित केल्या, तर त्यातून रडारवर उमटणारी प्रतिमा धूसर बनते किंवा बरीचशी दिसेनाशी होते. त्याला स्टेल्थ तंत्रज्ञान म्हणतात. आजकाल अनेक लढाऊ विमाने, युद्धनौका आणि रणगाड्यांच्या उत्पादनात हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यासाठी या शस्त्रास्त्रांचे पृष्ठभाग विशिष्ट कोनात तयार केले जातात. अथवा, त्यांच्या पृष्ठभागावर विशिष्ट लहरीशोषक आवरण बसवले जाते.

चीनने त्यांची क्षेपणास्त्रे शत्रूच्या रडारपासून लपवण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान विकसित केले आहे. चीनने त्यांच्या क्रूझ क्षेपणास्त्रांवर बसवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे रडार रिफ्लेक्टर्स बनवले आहेत. चीन आता हे तंत्रज्ञान युद्धनौका आणि रणगाड्यांवरही बसवण्याचा विचार करत आहे.

 रडारला असा देईल चकवा

चीनने बनवलेले हे रडार रिफ्लेक्टर्स गरजेनुसार त्यांचा आकार बदलू शकतात किंवा त्यांचे काम बंद किंवा चालू करू शकतात. हे रिफ्लेक्टर्स धातूच्या सूक्ष्म तारांपासून बनवले आहेत आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. शत्रूच्या रडारच्या लहरी त्यावर आदळल्या की, अशा प्रकारे परावर्तित होतात की त्यातून रडारच्या स्क्रीनवर क्षेपणास्त्राएवढा प्रवासी विमानाचा आकार दिसतो. त्यामुळे शत्रूच्या सैन्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. रडारवर प्रवासी विमान दिसल्याने शत्रू ते पाडण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्यक्षात क्षेपणास्त्र आपले काम अचूक साधते.

logo
marathi.freepressjournal.in