प्रिगोझीन गायब ? रशियन लष्कराकडून चौकशी सुरूच

सोमवारपर्यंत प्रिगोझीन हे नेमके कोठे आहेत, ते खात्रीशीरपणे समजू शकलेले नाही. ते बेलारूसमध्ये आहेत की नाहीत किंवा असल्यास त्यांची स्थिती काय आहे
प्रिगोझीन गायब ? रशियन लष्कराकडून चौकशी सुरूच

मॉस्को : रशियात शनिवारी बंड करणारे वॅग्नर ग्रुपचे नेते येवगेनी प्रिगोझीन यांच्यावरील सशस्त्र बंडखोरीचे आरोप मागे घेतले नसून त्यांची चौकशी सुरूच असल्याचे वृत्त तास या रशियन वृत्तसंस्थेने दिले आहे. बेलारुसमध्ये हद्दपार केलेले प्रिगोझीन कुठे आहेत, माहीत नसल्याचे बोलारूसने म्हटल्याने प्रिगोझीन यांच्या नेमक्या ठावठिकाण्याबाबत संदिग्धता कायम आहे.

प्रिगोझीन यांनी शनिवारी बंडाचे निशाण फडकावत मॉस्कोच्या रोखाने चाल सुरू केली होती, पण काही तासांतच त्यांनी रक्तपात टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रोस्टोव्ह आणि अन्य ठिकाणांहून त्यांचे सैनिक परत गेले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि प्रिगोझीन यांच्यात बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या मध्यस्थीने समझोता झाल्याने बंड अल्पावधीत शमले होते. या समझोत्यानुसार प्रिगोझीन आणि त्यांच्या सैनिकांवर बंडाबद्दल कारवाई होणार नाही, असे अभय देण्यात आले आणि प्रिगोझीन यांना बेलारूसमध्ये हद्दपार केले. तसेच वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांना रशियाच्या अधिकृत सैन्यात सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती क्रेमलीनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली होती.

मात्र, सोमवारपर्यंत प्रिगोझीन हे नेमके कोठे आहेत, ते खात्रीशीरपणे समजू शकलेले नाही. ते बेलारूसमध्ये आहेत की नाहीत किंवा असल्यास त्यांची स्थिती काय आहे, हे निश्चितपणे ठाऊक नसल्याचे बेलारूसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, तर प्रिगोझीन यांच्या वतीने समाजमाध्यमांवर अथवा अन्यत्र काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नेमक्या ठावठिकाण्याबद्दल अद्याप संदिग्धता कायम आहे.

दरम्यान, प्रिगोझीन यांच्यावरील आरोप मागे घेतले नसून त्यांची चौकशी सुरूच असल्याचे वृत्त तास या वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यासाठी त्यांनी रशियाच्या सॉलिसिटर जनरल कार्यालयातील सूत्रांचा हवाला दिला आहे.

पुतिन यांना पाठिंबा

शनिवारच्या बंडानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी विविध मित्रदेशांच्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा असल्याची खात्री करून घेतली आहे. त्यात चीन, इराण, कतार, सर्बिया आदी देशांचा समावेश आहे. बंडानंतर लगेचच रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रेई रुडेंको यांनी चीनला भेट दिली होती. त्यात चिनी नेत्यांनी पुतिन यांना पाठिंबा व्यक्त केला होता. पुतिन यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी आणि कतारचे अमिर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याबरोबर सोमवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यात या दोन्ही नेत्यांनी पुतिन यांना पाठिंबा व्यक्त केला. तसेच सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांनी पुतिन यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे कौतुक केले. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टीन यांनी संसदेच्या सर्व सदस्यांना पुतिन यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

युक्रेनला आणखी मदत

युरोपीय महासंघाने (ईयू) युक्रेनच्या युद्धप्रयत्नांना मदत म्हणून आणखी ३.८ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे जाहीर केले. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी युरोपीय महासंघाच्या नेत्यांना केलेल्या विनंतीनुसार ही वाढीव मदत देण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेनेही युक्रेनला १.३ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली होती. तत्पूर्वी अमेरिकेने युक्रेनला ६३ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. दरम्यान, युक्रेनच्या फौजांनी रशियाव्याप्त प्रदेशातील काही ठिकाणी तुरळक यश मिळवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in