
रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानाच्या आधुनिकीकरणाला ब्रेक लागला आहे.
सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दल रशिया व हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या मदतीने ८५ विमानांचे आधुनिकीकरण करणार होता. सध्याची परिस्थिती पाहता हा प्रकल्प आता थंड बस्त्यात टाकला आहे. तसेच भारताकडून आणखी अत्याधुनिक सुखोई ३० एमकेआय विमाने खरेदीचा २० हजार कोटींचा प्रकल्प थांबवण्याचे संकेत मिळत आहेत. कारण भारताने स्वदेशी संरक्षण उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विमानात जास्तीत जास्त सुटे भाग हे भारतीय बनावटीचे वापरायचे आहेत.
सुखोईत रडार लावायचे होते
हवाई दलाच्या योजनेनुसार, सुखोई-३० विमानाला अधिक शक्तीशाली रडार व इलेक्ट्रॉनिक्स युद्धासाठी तयार केले जाणार होते. त्यामुळे हे विमान सर्वात आधुनिक बनू शकले असते.
सुखोई-३० एमकेआय हे भारतीय हवाई दलाचे महत्वाचे विमान आहे. भारताने आतापर्यंत २७२ सुखोई विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील ३० ते ४० विमानांची ऑर्डर ही रशियन उत्पादकांना मिळणार होती. रशियन उत्पादक हे हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला वेगवेगळे किट्स पाठवत असतात. ते नाशिकच्या कारखान्यात जोडले जातात.
सुटे भाग पाठवण्यास विलंब
रशिया व युक्रेन युद्धामुळे रशियाकडून लढाऊ विमानांचे सुटे भाग मिळण्यास विलंब लागत आहे. मात्र, भारताने सर्जिकल स्ट्राईकनंतर सुट्या भागांचा मोठा स्टॉक करून ठेवला आहे. मात्र, काही काळानंतर सुटे भागव अन्य उपकरणांचा पुरवठा ही समस्या बनू शकते. त्यामुळेच हवाई दलाने परदेशी उपकरणांची संख्या मर्यादित ठेवली आहे.