

एव्हिएन : भारत आणि अमेरिकेदरम्यान अनेक तणावपूर्ण प्रसंग घडल्यानंतर अखेर १६ महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ‘जी-७’ शिखर परिषदेत भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आणि संवाद साधला. फ्रान्समधील एव्हिएन-ले-बॅन्स या शहरात दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड वर्षांनंतर झालेली ही पहिली प्रत्यक्ष भेट होती.
मोदी आणि ट्रम्प यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि त्यानंतर त्यांच्यात संक्षिप्त चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठक होणार आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या भारत दौऱ्यानंतर, दोन्ही देश द्विपक्षीय संबंधांची नव्याने उभारणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तथापि, गेल्या आठवड्यात ओमानच्या किनारपट्टीवर एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
इराणने अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा सर्वनाश - ट्रम्प
इराणने अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचा सर्वनाश होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. फ्रान्समध्ये आयोजित जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्यासोबत झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान त्यांनी हा इशारा दिला. लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर त्यांनी कडक शब्दांत निशाणा साधला.
माझ्याशिवाय इस्रायलचे अस्तित्वच नसते!
इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेत अमेरिकेचे स्थान स्पष्ट करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेशिवाय इस्रायलचे अस्तित्वच नसते. कारण मी जे केले ते करण्याची तयारी इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने दाखवली नव्हती. माझे नेतान्याहू यांच्यासोबत ‘उत्तम संबंध’ राहिले आहेत. पण, इस्रायली पंतप्रधानांनी लेबनॉनसंदर्भात अधिक जबाबदार राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.