
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडात होणाऱ्या आगामी ‘जी-७’ परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून मोदी ‘जी-७’ परिषदेला सातत्याने उपस्थित राहत होते.
भारत आणि कॅनडामधील सध्या तणावपूर्ण संबंधांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि कॅनडामधील संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठा तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतावर आरोप केला होता.
भारताने या आरोपांचे तीव्र शब्दांत खंडन केले होते आणि कोणतेही ठोस पुरावे समोर न आल्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर दोन्ही देशांनी परस्परांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हाकलून लावले आणि भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली होती.
इंग्रजी प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, भारत कॅनडाकडून आलेल्या ‘जी-७’ परिषदेत सहभागी होण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याची शक्यता कमी आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे कॅनडामधील खलिस्तानी कट्टरतावाद्यांचे वाढते अस्तित्व आणि भारताविरोधातील वातावरण हे दिले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे.