
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार १४ फेब्रुवारी) अमेरिका दौरा संपवून भारतासाठी रवाना झाले. यासोबतच त्यांच्या दोन दिवसीय (१२-१३ फेब्रुवारी) अमेरिकेच्या दौऱ्याची सांगता झाली. मोदींचा हा दौरा डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतरचा पहिला अमेरिका दौरा होता. या दौऱ्यात मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय तसेच महत्त्वाच्या जागतिक विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
मोदी-ट्रम्प चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे :
- द्विपक्षीय चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण व सुरक्षा, व्यापार व तंत्रज्ञान, ऊर्जा संबंध , लोकसंपर्क आणि दहशतवादाविरोधी कारवाई यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
- याशिवाय, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आणि दोन्ही देशांच्या परस्पर हिताच्या घडामोडींवरही चर्चा केली.
अमेरिका 2025 पासून भारताला अब्जावधी डॉलरच्या लष्करी उपकरणांची विक्री वाढवणार आहे.
भविष्यात भारताला F-35 स्टेल्थ फायटर जेट्स देण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे.
नव्या संरक्षण करारावर लवकरच सहमती होणार.
भारत अधिक अमेरिकन तेल आणि नैसर्गिक वायू आयात करणार, त्यामुळे व्यापार तूट कमी होणार.
दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठरवले.
अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय, अमेरिकेच्या प्रगत अणुऊर्जा तंत्रज्ञानाला भारतात संधी.
26/11 मुंबई हल्ल्याच्या आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास अमेरिकेने मंजुरी दिली.
“सीमा पार दहशतवाद रोखण्यासाठी ठोस कारवाईची गरज” – मोदी
“भारतासोबत सहकार्य वाढवणार” – ट्रम्प
ट्रम्प यांनी भारताच्या उच्च आयात शुल्कावर नाराजी व्यक्त केली, विशेषतः अमेरिकन कार्सवरील 70% शुल्काबाबत.
दोन्ही नेत्यांनी व्यापारातील असमानता दूर करण्यासाठी नव्या करारावर काम करण्याची सहमती दर्शवली.
अमेरिका भारताला ऊर्जेचा प्रमुख पुरवठादार बनण्यावर भर देणार.
लहान आण्विक रिअॅक्टर्ससाठी भारत-अमेरिका सहकार्य वाढवणार.
"मोदी महान मित्र" - ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "महान मित्र" संबोधले आणि त्यांना व्हाइट हाऊसमध्ये आमंत्रित करणे हा "मोठा सन्मान" असल्याचे सांगितले. तसेच, पंतप्रधान मोदींसोबत आपले "उत्कृष्ट संबंध" असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत तेल आणि नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार
"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणे हा मोठा सन्मान आहे. ते माझे दीर्घकाळापासून चांगले मित्र आहेत. आमचे संबंध नेहमीच उत्कृष्ट राहिले आहेत आणि गेल्या चार वर्षांच्या काळातही ते टिकून राहिले. आता पुन्हा नव्या सुरुवातीसाठी आम्ही सज्ज आहोत. आमच्यात काही मोठ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे भारत आमच्याकडून तेल आणि नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार आहे," असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
"आमच्याकडे जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक तेल आणि नैसर्गिक वायू आहे. भारताला त्याची गरज आहे आणि आमच्याकडे तो मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे व्यापारासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी, तुम्हाला भेटणे हा माझ्यासाठी खरा सन्मान आहे. तुम्ही माझे जुने मित्र आहात. उत्कृष्ट कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन!" असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान चर्चा झालेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना "विशेष नाते" असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही (भारत) आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही (अमेरिका) यांच्यात खास नाते असून दोघांनी संबंध आणखी दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे.
भारताला F35 फायटर जेट देणार
भारताला F35 फायटर जेट पुरवण्याचा करार झाल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. "आम्ही भारताला भविष्यात F-35 स्टेल्थ फायटर्स उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा करत आहोत," असे ट्रम्प म्हणाले. तसेच, "या वर्षापासून आम्ही भारताला अब्जावधी डॉलरच्या लष्करी उपकरणांची विक्री वाढवणार आहोत", असेही त्यांनी सांगितले. २०२५ पासून अमेरिका भारताला लष्करी उपकरणांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे आणि भविष्यात F-35 स्टेल्थ फायटर जेट्स देखील पुरवणार आहे.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत याचा उल्लेख करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाला "जगातील अतिशय वाईट व्यक्तींपैकी एक" असे संबोधले.
"ट्रम्प यांसारखेच मीही भारताच्या राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देतो" - मोदी
द्विपक्षीय चर्चेदरम्यान तसेच संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. मला ठाम विश्वास आहे की, तुमच्या दुसऱ्या कार्यकाळात आपण अधिक वेगाने काम करू, असे मोदी म्हणाले. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नेहमी अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताला सर्वोच्च स्थान देतात, आणि त्यांच्याप्रमाणेच मीही भारताच्या राष्ट्रीय हिताला सर्वात वरचे स्थान देतो," असे मोदी म्हणाले.
मी पुन्हा स्पष्ट करतो की, भारत तटस्थ नाही - मोदी
युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, "भारताला शांतता हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. जगाला वाटते की, भारत या युद्धात तटस्थ राहिला आहे. पण मी पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की, भारत तटस्थ नाही, तर भारत नेहमीच शांततेच्या बाजूने आहे."
"हे युद्धाचे युग नाही, संवादातूनच समाधान मिळू शकते" - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटलो, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितले होते की, 'हे युद्धाचे युग नाही.' मी हेही म्हटले होते की, कोणतेही समाधान युद्धाच्या मैदानावर मिळू शकत नाही, ते फक्त सर्व पक्षांनी चर्चेच्या टेबलावर बसल्यानंतरच मिळू शकते." “भारत आणि अमेरिका मिळून जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.