टोराण्टो : कॅनडाच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेल्या एका भारतीय वंशाच्या गुन्हेगाराला अखेर टोरोंटो पोलिसांनी अटक केली. निकोलस सिंग असे या गुन्हेगाराचे नाव असून, गेल्या १८ महिन्यांपासून तो फरार होता. पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निकोलसविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती रविवारी कॅनडाच्या पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी कॅनडा सरकारने भारतातील लॉरेन्स बिश्नोई टोळीलाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. कॅनडा सरकारने त्याला ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून घोषित केले होते.
कॅनडियन पोलिसांनी २०२३ मध्ये निकोलस सिंगला चोरी आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच वर्षे पाच महिने आणि दहा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी टोरोंटो येथील तुरुंगात शिक्षा भोगत असताना निकोलस फरार झाला होता. ऑगस्ट २०२४ पासून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. निकोलसच्या अटकेसाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्यांची नेमणूक करण्यात आली होती.