माले महापौर निवडणुकीत मुईझू यांना धक्का; विरोधी पक्षाचे उमेदवार आदम अझीम यांची निवड

मुईझू यांचे सरकार अडचणीत आलेले असतानाच मालेच्या महापौर निवडणुकीतही त्यांना फटका बसला आहे.
माले महापौर निवडणुकीत मुईझू यांना धक्का; 
विरोधी पक्षाचे उमेदवार आदम अझीम यांची निवड

माले : मालदीवची राजधानी माले शहराच्या महापौरपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत देशाचे चीनधार्जिणे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) या पक्षाचा पराभव झाला आहे. मुईझू यांच्या विरोधातील आणि भारताला अनुकूल असलेल्या मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) उमेदवार आदम अझीम यांची मालेच्या महापौरपदी निवड झाली आहे. निवडणुकीत पीएनसीच्या उमेदवार ऐशथ अझीमा शकूर यांचा पराभव झाला. शकूर यांना ३,३०१ मते मिळाली. तर विरोधी एमडीपीचे उमेदवार अझीम यांना ५,३०३ मते मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीवरून दोन्ही देशांत नुकताच तणाव निर्माण झालेला असताना मुईझू यांच्या पक्षाचा हा पराभव महत्त्वाचा मानला जात आहे. मालदीवमध्ये २०२३ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मुईझू यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) आणि प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्ज (पीपीएम) या पक्षांचे आघाडी सरकार आहे. भारताबरोबर झालेल्या वादाच्या दरम्यान मुईझू यांच्या पक्षाला अडचणीत आणणारा अहवाल युरोपीय महासंघाच्या मालदीवमधील निवडणूक निरीक्षण मंडळाने जाहीर केला आहे. या अहवालानुसार मालदीवच्या सत्ताधारी आघाडीने २०२३ सालच्या निवडणुकीत मते मिळवण्यासाठी भारतविरोधी भावनांचा आणि अपमाहितीचा वापर केला होता. या अहवालामुळे मुईझू यांचे सरकार अडचणीत आलेले असतानाच मालेच्या महापौर निवडणुकीतही त्यांना फटका बसला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in