

बँकॉक : म्यानमारच्या लष्कराने सोमवारी एका बलाढ्य बंडखोर गटाच्या नियंत्रणाखालील भागात केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात ४९ जणांचा मृत्यू झाला असून ५८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राखीन राज्यातील एका प्रमुख बाजारपेठेजवळ हा हल्ला करण्यात आला. बंडखोर गट आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
म्यानमारमधील लोकशाही समर्थक सशस्त्र गट आणि विविध वांशिक सशस्त्र संघटनांविरुद्ध लष्कराकडून सुरू असलेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यांच्या मालिकेतील ही ताजी घटना आहे. १ फेब्रुवारी २०२१ रोजी म्यानमारच्या लष्कराने आंग सान सू ची यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून सत्ता हस्तगत केली होती. तेव्हापासून संपूर्ण देशात हिंसाचार आणि तणावाचे वातावरण आहे.
लढाऊ विमानातून टाकले २ बॉम्ब
राखीन राज्यातील अराकान आर्मी या बलाढ्य वांशिक सशस्त्र गटाने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला 'क्यॉकटॉ' शहरात झाला. हे ठिकाण म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मांडलेपासून सुमारे ३४० किलोमीटर पश्चिमेस आहे.