
नेपीडॉ/नवी दिल्ली : भारत आणि म्यानमार सीमेवरील कारवायांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि निर्णायक कारवाई झाल्याचे वृत्त आहे. २० ऑक्टोबरच्या रात्री म्यानमारच्या सगाइंग भागामध्ये नागा अतिरेकी गट एनएससीएन (के-वायए) च्या तळांवर भीषण ड्रोन हल्ला करण्यात आला. काही दिवसांपूर्वी आसाम रायफल्सच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या बदल्यात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईत भारतविरोधी मेजर जनरल पी. आंग माई या वरिष्ठ कमांडरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र याला अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या ड्रोन हल्ल्यात हाय-प्रिसिजन गाईडेड ड्रोन वापरून अनेक बॉम्ब डागण्यात आले, ज्यामुळे उग्रवाद्यांचे कमांड पोस्ट आणि आजूबाजूच्या निवासी जागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. अनौपचारिक माहितीनुसार, हल्ल्यानंतर आंग माईच्या कमांड युनिटशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पी. आंग माई हा एनएससीएन (के-वायए) या गटाचा वरिष्ठ नेता होता आणि त्याला भारतविरोधी मानले जात होते. काही महिन्यांत झालेला हा दुसरा मोठा ड्रोन हल्ला आहे. यापूर्वी जुलै २०२५ मध्ये झालेल्या अशाच कारवाईत उल्फा-१ आणि एनएससीएन-के या गटांचे अनेक नेते मारले गेले होते.
उल्फा-१ आणि एनएससीएन (के-वायए)च्या संशयित उग्रवाद्यांनी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात असलेल्या आसाम रायफल्सच्या तळावर हल्ला केला होता. म्यानमारमधील सगाइंग प्रदेश हा नागा आणि आसाममधील अतिरेकी गटांसाठी गेली अनेक वर्षे लपण्याचा, दहशतवादी कारवाया करण्याचा तळ बनला आहे. भारतीय गुप्तचर संस्था आणि म्यानमारमधील स्थानिक गट यांच्यात समन्वयाने ही कारवाई झाल्याची शक्यता काही विश्लेषकांनी वर्तवली आहे