

पाठोपाठ बसलेल्या दोन शक्तीशाली भूकंपांच्या धक्क्यांमुळे शुक्रवारी म्यानमार हादरले. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, शेजारील देश थायलंडमध्येही मोठा विनाश झालाय. चीन आणि ईशान्य भारतातील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.
३० मजली इमारत कोसळली, ४३ कामगार अडकले
भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना, भींतींना तडा गेले आहेत. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली, त्यात ४३ कामगार अडकले, असे पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी कार्यालयांसाठी बनवलेली ही भव्य इमारत काही सेकंदातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि काही क्षणांतच मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेतील ७ जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य अद्यापही सुरू आहे.
म्यानमारमधील सहा प्रदेश आणि राज्यांमध्ये आणीबाणी
म्यानमारमधील सहा प्रदेश आणि राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. माहितीनुसार, सर्वप्रथम दुपारी १२.५० च्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.७ एवढी मोजली गेली. त्यानंतर थोड्याचवेळात, साधारणतः १३ मिनिटांनी ६.७ रिश्टर स्केलचा दुसरा धक्का जाणवला. म्यानमारमधील Sagaing हे भूकंपाचे केंद्र होते. म्यानमारमध्ये भूकंपामुळे एक मशीद कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय एवा ब्रिजही कोसळल्याचे वृत्त आहे. म्यानमारची राजधानी Naypyidaw येथे १००० खाटांचे जनरल हॉस्पिटल हे ‘मास कॅज्युअल्टी एरिया’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाबाहेर जखमींची मोठी गर्दी झाली आहे.
शक्य तितक्या लवकर मदत करा, म्यानमारची विनंती
म्यानमारमधील सत्ताधारी लष्करी प्रशासन सहसा नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीची मागणी करीत नाही. मात्र, "आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदायाने शक्य तितक्या लवकर मदत करावी," अशी विनंती म्यानमार सरकारने केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
भारत, चीनमध्ये सौम्य धक्के; कोलकाता आणि इंफाळ हादरले
भारताच्या कोलकाता आणि इंफाळ शहरांमध्येही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. कोलकातामध्ये लोकांनी भिंतीवरील शोभेच्या वस्तू हलताना पाहिल्या. तथापि, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले नाही. इम्फाळ (मणिपूर) येथे थांगाल बाजार परिसरात विशेषतः घबराटीचे वातावरण होते, कारण त्या परिसरात अनेक जुन्या बहुमजली इमारती आहेत. चीनच्या दक्षिण-पश्चिम युनान प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बीजिंग भूकंप संस्थेने स्पष्ट केले आहे.
भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार - मोदी
म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भूकंपानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी यांनीही चिंता व्यक्त केली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी, "सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारांशी संपर्कात राहण्यासही सांगितले आहे", असे म्हटले आहे.