भारत-इटली द्विपक्षीय चर्चा; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर भर; २०२९पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार रोजी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. या व्यापक चर्चेमध्ये प्रामुख्याने व्यापार, संरक्षण, स्वच्छ (हरित) ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
भारत-इटली द्विपक्षीय चर्चा; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर भर; २०२९पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य
भारत-इटली द्विपक्षीय चर्चा; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर भर; २०२९पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य
Published on

रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार रोजी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. या व्यापक चर्चेमध्ये प्रामुख्याने व्यापार, संरक्षण, स्वच्छ (हरित) ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. भारत-इटली संबंधांना नवी दिशा मिळाली असून २०२९ पर्यंत २२ अब्ज युरोच्या वापाराचे लक्ष्य ठरविण्यात आले असून स्पेशन स्ट्रॅटजिक पार्टनरशिपवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी मंगळवारी रात्री रोमकडे रवाना झाले होते. बुधवारी औपचारिक चर्चेसाठी आगमन झाल्यावर त्यांचे पारंपरिक लष्करी सन्मानासह जंगी स्वागत करण्यात आले. द्विपक्षीय चर्चेपूर्वी मोदी यांनी इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक संबंध यासोबतच 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स', खनिजे, अंतराळ संशोधन आणि आण्विक ऊर्जा या क्षेत्रांतील सहकार्यावर सकारात्मक चर्चा झाली.

'स्ट्रॅटेजिक अ‍ॅक्शन प्लॅन'

मोदी म्हणाले की, या भेटीमुळे भारत आणि इटली यांच्यातील संबंधांना एक नवी दिशा मिळेल. विशेषतः 'भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर' च्या अंमलबजावणीवर आमचे विशेष लक्ष असेल. तसेच दोन्ही देशांमधील आगामी काळातील सहकार्याचा मुख्य आराखडा असलेल्या 'संयुक्त धोरणात्मक कृती योजना २०२५-२०२९'चा आढावा दोन्ही बाजूंकडून घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

युरोपीय युनियनमध्ये इटली हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. तसेच इटलीने आपल्या जागतिक व्यापार धोरणात भारताला 'प्राधान्यक्रमाचा देश' म्हणून स्थान दिले आहे. जानेवारी २०२५ च्या आकडेवारीनुसार, इटलीमध्ये अंदाजे १,८६,८३३ भारतीय नागरिक राहतात, जी युरोपीय युनियनमधील सर्वात मोठी भारतीय डायस्पोरा (प्रवासी समाज) आहे. याशिवाय, इटलीतील विविध विद्यापीठांमध्ये ५,१०० हून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या उच्च शिक्षण घेत आहेत.

कोलोसियमला भेट, सेल्फी

यापूर्वी, मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात मंगळवारी इटलीला पोहोचले. तेथे पंतप्रधान मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी रोमच्या रस्त्यांवर एकाच गाडीतून प्रवास केला आणि सुमारे २००० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कोलोसियमला भेट दिली. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकत्र डिनरही केले आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनौपचारिक चर्चाही केली. मेलोनी यांनी मोदींसोबत सेल्फी शेअर करत लिहिले, "वेलकम टू रोम, माय फ्रेंड." दोन्ही नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in