

वॉशिंग्टन : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने पाठवलेले ‘पार्कर सौर प्रोब’ हे यान मंगळवारी सायंकाळी सूर्याच्या जवळून गेले. त्यावेळी हे यान सूर्यापासून ६१ लाख किमी अंतरावर होते. सूर्यापासून या अंतरावर जाणारे मानवाचे हे पहिलेच यान ठरले आहे.
मानवाने सूर्याच्या अभ्यासासाठी पावलेल्या अन्य यानांच्या तुलनेत ‘पार्कर सौर प्रोब’ हे यान सूर्याच्या ७ पट अधिक जवळ गेले आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणापासून जाताना ‘पार्कर’चा वेग प्रति तास ६.९ लाख किमी होता.
हजार अंश तापमान
पार्कर सौर प्रोब हे यान सूर्याजवळ पोहचले आहे. या ठिकाणचे तापमान एक हजार अंशापेक्षा जास्त होते. २८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हे यान सुरू आहे की भस्मसात झाले आहे याची माहिती मिळेल. कारण हे यान सूर्याच्या वातावरणात फिरत असेल. तेव्हा अत्यंत मोठ्या तापमानाचा सामना या यानाला करावा लागेल. हे यान २०२५ मध्ये दोन वेळा सूर्याजवळून प्रवास करणार आहे. पुढील वर्षी ही मोहीम संपणार आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम पुढेही चालू ठेवण्यासाठी आवश्यक इंधन या यानात आहे.
नासाच्या विज्ञान मोहिमेचे निकी फॉक्स म्हणाले की, आतापर्यंत सूर्याच्या जवळ कोणतीही मानवी वस्तू गेलेली नाही. पहिल्यांदाच सूर्याच्या वातावरणात मानवी वस्तू पोहोचली आहे. येते तीन दिवस सूर्याच्या वातावरणात ‘पार्कर’ राहील. शेकडो वर्षांपासून लोक सूर्याचा अभ्यास करत आहेत. तुम्ही कोणत्याही वातावरणात जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही. त्यामुळे आम्ही सूर्याचा वास्तविक अनुभव घेण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला आहे.
६ वर्षांपासून मोहीम सुरू
पार्कर सौर प्रोब ही मोहीम नासाने १२ ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू केली. सूर्याच्या बाहेरी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत सौर हवा वातावरणाचा अभ्यास केला जात आहे. या यानाचे नाव सूर्यावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ यूजीन पार्कर यांच्यावर नावाने ठेवले. पार्कर यांनीच पहिल्यांदा सौर वाऱ्यांबाबत माहिती दिली. २०२२ मध्ये पार्कर यांचे निधन झाले.
सूर्याच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी या यानाला ४.५ इंचाचे कार्बनयुक्त कवच लावले आहेत.