
वॉशिंग्टन : ‘नासा’ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले ‘पार्कर सोलर प्रोब’ यान ९८२ अंश तापमानातही सुरक्षित राहिले आहे. हे यान १ जानेवारीपासून पृथ्वीवर माहिती पाठवण्यास सुरुवात करणार आहे.
‘नासा’ने सांगितले की, ‘पार्कर सोलर प्रोब’ यानाने २४ डिसेंबर रोजी सूर्यापासून ६१ लाख किमीवरून अंतरावर प्रवास केला. सूर्याच्या जवळ जाणारे हे पहिलेच यान ठरले आहे. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे यान १ जानेवारीपासून आपली लोकेशन व मिळवलेली माहिती पाठवणार आहे. सूर्याजवळून जाताना या यानाचा वेग ६.९ लाख किमी प्रति तास होता. तेव्हा यानाने ९८२ अंश सेल्सिअस तापमान सहन केले. तरीही या यानाचे कोणतेही नुकसान झाले नाही.‘पार्कर सोलर प्रोब’ने २७ डिसेंबरला पृथ्वीवरील नासाच्या ‘जॉन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरी’ला संदेश पाठवला की, ते सुरक्षित आहे.
पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेल्या सूर्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने हे यान ‘नासा’ ने पाठवले आहे. हे यान सूर्याच्या बाहेरील वातावरणात पोहचल्याने वैज्ञानिकांना सूर्याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे यान नासाने १२ ऑगस्ट २०१८ रोजी सूर्याच्या दिशेने पाठवले. या मोहिमेद्वारे सौर हवेचा अभ्यास केला जाणार आहे.