
ब्रुसेल्स : भारतासह चीन आणि ब्राझील या देशांनी रशियाशी सुरू असलेला व्यापार थांबविला नाही तर या देशांना १०० टक्के टॅरिफ आणि निर्बंधांचा सामना करावा लागेल, असा इशारा ‘नाटो’चे महासचिव मार्क रूट यांनी दिला आहे.
अमेरिकेच्या कॅपिटॉल हिल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रूट म्हणाले, जर तुम्ही भारताचे पंतप्रधान, चीनचे राष्ट्राध्यक्ष किंवा ब्राझिलचे अध्यक्ष असाल, तर समजून घ्या की रशियाशी व्यापार सुरू ठेवण्याचे गंभीर परिणाम होतील. त्यांनी तीनही देशांना आवाहन केले की, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव टाकून युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यास त्यांनी भाग पाडावे.
रूट यांनी अन्य निर्बंध लावण्याची धमकीही दिली. जर भारत, चीन किंवा ब्राझीलने रशियाकडून तेल किंवा गॅस खरेदी सुरूच ठेवली, तर त्यांच्यावर पूर्ण १०० टक्के आयात कर लावण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. ‘सेकंडरी सँक्शन्स’ म्हणजे असे निर्बंध जे थेट एखाद्या देशावर नसतात, पण त्या देशाशी व्यापार करणाऱ्या तिसऱ्या देशांवर लागू होतात.
धोरणे बदलणार नाही - रशिया
दरम्यान, रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव यांनी या धमक्यांकडे दुर्लक्ष केले आहे. रशिया कोणताही अल्टीमेटम मानत नाही, आम्ही कोणत्याही अल्टिमेटमला स्वीकारत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी ठामपणे सांगितले की, आम्ही आर्थिक दबावाखालीही आपले धोरण बदलणार नाही. गरज भासल्यास पर्यायी व्यापारी मार्ग शोधू.
ट्रम्प यांची घोषणा आणि ‘नाटो’चा पाठिंबा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच रशियावर १०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. त्यावेळी ‘नाटो’चे महासचिव रूट त्यांच्यासोबत होते. ट्रम्प म्हणाले होते की, मी व्यापाराचा वापर केवळ आर्थिक कारणांसाठी नव्हे, तर युद्ध थांबवण्यासाठीही करतो. उदाहरणार्थ, भारत जर रशियाकडून तेल खरेदी करत असेल आणि अमेरिका रशियावर निर्बंध लावत असेल, तर अमेरिकेला अधिकार असतो की, ती भारताच्या त्या कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लागू करेल.
भारतावर संभाव्य परिणाम
भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करणारा देश आहे. २०२२ नंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून देशाच्या ऊर्जा गरजा भागवल्या आहेत. जर ‘नाटो’ने सेकंडरी टॅरिफ आणि निर्बंध लावले, तर भारताला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
बेताल वक्तव्य
दरम्यान, भारताचे माजी राजनैतिक अधिकारी के. बी. फॅबियन यांनी नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रूट यांना अशा प्रकारचे निर्बंध लादण्याचे कोणतेही अधिकार नसतानाही ते मूर्खपणे बेताल वक्तव्य करीत आहेत, असे फॅबियन यांनी म्हटले आहे.