लिथियम बॅटरींना नैसर्गिक पर्याय ;कापूस, मेंदी, समुद्राचे पाणी आदींवर संशोधन

विजेचा शोध लागल्यापासून मानवाचे आयुष्य आमूलाग्र बदलून गेले आहे. मात्र, विजेबाबत एक अडचण अशी की, ती साठवून ठेवता येत नाही
लिथियम बॅटरींना नैसर्गिक पर्याय ;कापूस, मेंदी, समुद्राचे पाणी आदींवर संशोधन

लंडन : आधुनिक मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर बॅटरींवर अवलंबून आहे. टॉर्चपासून मोबाईल, संगणक आणि इलेक्ट्रिक कारपर्यंत रोजच्या वापरातील अनेक वस्तू बॅटरींवर चालतात. या बॅटरी बनवण्यासाठी वापरले जाणारे लिथियम, ग्राफाइटसारखे पदार्थ पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. त्यात कापूस, समुद्राचे पाणी, मेंदी यासह निसर्गात सहजपणे आढळणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश आहे.

विजेचा शोध लागल्यापासून मानवाचे आयुष्य आमूलाग्र बदलून गेले आहे. मात्र, विजेबाबत एक अडचण अशी की, ती साठवून ठेवता येत नाही. ही अडचण बॅटरीच्या शोधानंतर काही प्रमाणात दूर झाली. वीज ही एक ऊर्जा असल्याने तिचे अन्य प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करता येते. उदाहरणार्थ विजेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करून ती बॅटरीत साठवता येते आणि पुन्हा तिचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून हवी तेव्हा वापरता येते. त्यामुळे वैज्ञानिक जगतात या शोधाला महत्त्व आहे.

सध्याच्या बॅटरी प्रामुख्याने ग्राफाइट आणि लिथियम यावर आधारित आहेत, पण या दोन्ही पदार्थांचे उत्पादन करताना पर्यावरणाची हानी होते. ग्राफाइट जीवाष्म इंधनातून मिळते आणि ते जमिनीतून काढून शुद्ध करताना बरेच प्रदूषण होते. तसेच लिथियमचे खाणकाम आणि शुद्धीकरण करताना पाणी आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यांनतरच्या प्रक्रियेत आसपासच्या पर्यावरणाची बरीच हानी होते. त्यामुळे बरेच देश लिथियमचे शुद्धीकरण आपल्या देशात न करता त्यासाठी ते चीनमध्ये पाठवतात. तेथे पर्यावरणाच्या नियमांचे फारसे काटेकोरपणे पालन होत नाही.

या कारणांमुळे आता अनेक देश लिथियम आणि ग्राफाइटच्या बॅटरींना नैसर्गिक पर्याय शोधू लागले आहेत. त्यात कापसाचा पर्याय प्रामुख्याने पुढे येत आहे. बॅटरीतील इलेक्ट्रोलाइट म्हणून समुद्राचे पाणी, तर इलेक्ट्रोड्ससाठी कापूस, मका, मेंदी, वनस्पतींमधील लिग्निन आदी पदार्थांचा वापर करण्यावर संशोधन सुरू आहे. त्यातून काही आशादायक निष्कर्षही निघाले आहेत. पण या पदार्थांतून कार्बन किंवा अन्य द्रव्यांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यात सध्या अडचणी जाणवत आहेत. त्यावर मात करून भविष्यात बॅटरीला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होतील, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

भारतात एटीएम मशीनमध्ये प्रयोग

जपानच्या पीजेपी आय नावाच्या कंपनीने त्यावर संशोधन करून बॅटरी तयार केली आहे. त्याचे अधिक तपशील कंपनीने सादर केलेले नाहीत, पण उपलब्ध माहितीनुसार कापूस साधारण ३००० अंश सेल्सिअसवर जाळला जातो. एक किलो कापसाच्या ज्वलनातून सुमारे २०० ग्रॅम कार्बनची निर्मिती होते. त्यापासून बॅटरीचा अॅनोड बनवला जातो. बॅटरीच्या एका सेलसाठी केवळ २ ग्रॅम कार्बन वापरला जातो. अशा प्रकारच्या बॅटरी नेहमीपेक्षा अधिक वेगाने चार्ज होतात. यातील काही बॅटरी कंपनीने भारतातील बँकांच्या एटीएम मशीनमध्ये वापरून पाहिल्या आहेत. त्यांचे कार्य समाधानकारक आहे.

logo
marathi.freepressjournal.in