

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका NASA मध्ये उच्च पदावर नियुक्त असलेल्या भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र यांना बसलाय. अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ला इच्छा नसतानाही नीला यांना नोकरीवरुन काढून टाकावे लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डायव्हर्सिटी प्रोग्राम बंद करण्याच्या आदेशावर नासाने ही मोठी कारवाई केली आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने (जेपीएल) सर्व कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नीला यांना नोकरीवरुन काढल्याची माहिती दिली आहे. नीला या नासाच्या डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन (DEI) च्या प्रमुख होत्या.
अमेरिकेत पुन्हा सत्तेत आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सर्व डायव्हर्सिटी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत डायव्हर्सिटी प्रोग्रामसाठी करण्यात आलेल्या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या. मात्र, व्हाईट हाऊसकडून नोटीस मिळाल्यानंतरही नासाने नीलाची नोकरी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पद बदलण्यात आले. मात्र, ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळे आता नासाकडे नीलाला काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता.
भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र यांचे नाव नासाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या यादीत येते. नीला राजेंद्र नासाच्या डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन (DEI) प्रमुख होत्या. तथापि, ट्रम्प यांच्या आदेशानंतर, १० मार्च रोजी नासाने नीला यांना 'हेड ऑफ ऑफिस ऑफ टीम एक्सीलेंस अँड एम्प्लॉय सक्सेस' या पदावर नियुक्त केले होते. प्रत्यक्षात मात्र नीला NASA मध्ये DEI प्रमुख म्हणूनच कार्यरत होत्या.
नोकरी वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न
ट्रम्प यांच्या आदेशानंतर नासाने नीलाचे पद बदलले. पण, डायव्हर्सिटी प्रोग्रामबाबत ट्रम्प यांची कठोर भूमिका अजूनही तशीच कायम आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी डायव्हर्सिटी प्रोग्रामबाबत अधिक आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले होते. अशा परिस्थितीत नासाकडे नीलाला नोकरीवरून काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या (जेपीएल) संचालक लॉरी लेशिन यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सांगितले की, "नीला आता जेपीएलचा भाग नाही. तिच्या नासामधील योगदानाबद्दल आम्ही नेहमीच कृतज्ञ राहू. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो."
...म्हणून ट्रम्प यांचा डायव्हर्सिटी प्रोग्रामला विरोध
डायव्हर्सिटी प्रोग्राममुळे अमेरिका वंश, रंग आणि लिंगाच्या आधारावर विभागली गेली आहे, असे ट्रम्प यांचे मत आहे. असे कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक पैशांची केवळ उधळपट्टी. यामुळे भेदभाव वाढतो. म्हणूनच ट्रम्प यांनी अमेरिकेत चालणारे सर्व डायव्हर्सिटी प्रोग्राम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर NASA सहित अनेक संस्थांनी आपली डायव्हर्सिटी कार्यालये पूर्णपणे बंद केली आहेत.