नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

तिबेटच्या सीमावर्ती भागातून आलेल्या भीषण महापुराने मध्य नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. या प्रलयात आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा असून, सुमारे ५०० जण बेपत्ता झाले आहेत. तर एक हजाराहून अधिक जण वाहून गेल्याचेही वृत्त आहे.
नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश
नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश
Published on

काठमांडू : तिबेटच्या सीमावर्ती भागातून आलेल्या भीषण महापुराने मध्य नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. या प्रलयात आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा असून, सुमारे ५०० जण बेपत्ता झाले आहेत. तर एक हजाराहून अधिक जण वाहून गेल्याचेही वृत्त आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या १३३ भारतीयांचा आणि ३७ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. नेपाळमधील या हृदयद्रावक घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधून दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

भोटे कोशी आणि त्रिशुली नदीच्या पात्रात बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास पाण्याचा प्रवाह अचानक प्रचंड प्रमाणात वाढल्याने ही आपत्ती ओढावली. रसुवा, धाडिंग, नुवाकोट आणि चितवन हे जिल्हे त्यामुळे बाधित झाले असून रसुवा जिल्ह्याला या पुराचा सर्वात मोठा फटका बसला आहे. सुमारे ८० सुरक्षा कर्मचारी (४४ नेपाळी सैनिकांसह) बेपत्ता आहेत. ४ कायमस्वरूपी पक्के पूल आणि अनेक तात्पुरते पूल वाहून गेले आहेत. रसुवागढी सीमाभागातील ४२ किमीचा बेत्रावती-रसुवागढी मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. रसुवागढी (१११ मेगावॉट), संजेन खोला (७८ मेगावॉट) आणि अप्पर त्रिशुली ३ ए (६० मेगावॉट) यांसारख्या १३ कार्यरत व निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे.

भारताची मदत

नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी संवाद साधून संपूर्ण मानवी व तांत्रिक मदतीचे आश्वासन दिले आहे. भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. काठमांडूमधील भारतीय दूतावासाने बाधित भारतीय नागरिक व त्यांच्या नातेवाईकांसाठी २४ तास आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत: +९७७ ९८५ १३१ ६८०७ +९७७ ९७० ९१० ७५०० (नेपाळ पर्यटन बोर्डाचा टोल-फ्री क्रमांक: १२३४ / हॉटलाइन: ११४४)

बिहारमध्ये ‘हाय अलर्ट

नेपाळमधील भोटे कोशी नदीचे पाणी त्रिशूली नदीतून पुढे भारतातील गंडक आणि कोशी नद्यांमध्ये येत असल्याने बिहारमध्ये पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अत्यंत सतर्क झाले असून संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेत एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक स्वतः परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवून आहेत. तसेच, सीमावर्ती भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

गंडक धरणाचे ३६ दरवाजे उघडले

बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपाळगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाल्मिकीनगर येथील गंडक धरणाचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीकीनगर बॅरेजमधून सुमारे ८६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. बॅरेजवर अधीक्षक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक टीम तैनात करण्यात आली असून नदीच्या खोऱ्यातील सर्व जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. नेपाळमधील देवघाट येथे नारायणी नदीची पातळी धोक्याच्या चिन्हाकडे जात असल्याने पुढील काही तास बिहारसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

चीन-नेपाळ सीमेवर भीषण ढगफुटी, महापूर

बीजिंग / काठमांडू : चीन-नेपाळ सीमेवरील तिबेट स्वायत्त प्रदेशात बुधवारी सकाळी अचानक आलेल्या विनाशकारी महापूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सर्व यंत्रणांना युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम राबवण्याचे कडक आदेश दिले आहेत. चीनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जिराँग काउंटियातील सीमावर्ती बंदरावर सकाळी १०:३० च्या सुमारास अचानक चिखल आणि ढिगारा कोसळल्याने अनेक गावे व शहरे पाण्याखाली गेली आहेत. यात अनेक जण बेपत्ता झाले असून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे, जखमींवर वेळेत उपचार करणे आणि दुय्यम आपत्तींचा धोका टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बचाव कार्य चालवण्याच्या सूचना जिनपिंग यांनी दिल्या आहेत. पीपल्स आर्म्ड पोलिसच्या शिगात्से तुकडीतील १४५ अधिकारी आणि सैनिकांना तातडीने आपत्कालीन मोहिमेसाठी सीमावर्ती भागात पाठवण्यात आले आहे.

महापुराचे मोठे कारण

नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने उपग्रह चित्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ-तिबेट सीमेवर २० किमी ईशान्येकडील पर्वतावर भीषण रॉक स्लाईड (खडक कोसळणे/दरड कोसळणे) झाले. त्यामुळे ल्हेन्दे नदी अडवली गेली व अचानक पाण्याचा प्रचंड लोट भोटे कोशी आणि त्रिशुली नदी पात्रात शिरला. नेपाळी सेना, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिसांची पथके बचावकार्यात तैनात करण्यात आली आहेत.

‘ग्लेशिअर आऊटबर्स्ट’चा परिणाम

तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या या पुराने रौद्ररूप घेतले असून बुधवारी सकाळी रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे हजारोंहून अधिक लोक वाहून गेले तर अनेक घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. अनेक नदीकाठच्या वस्त्यांचे नुकसान झाले आहे. हाइड्रोलॉजी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाण्याचा अचानक प्रवाह स्थानिक पावसाचे कारण नाही तर तिबेटमध्ये 'ग्लेशियर लेक आउटबर्स्ट' म्हणजे ग्लेशियर सरोवर फुटल्याने महापूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीत एक हजाराहून अधिक लोक वाहून गेले आहेत. स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या वस्त्यांना पुरामुळे मोठा फटका बसला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in