

काठमांडू : नेपाळमधील त्रिशुली नदीच्या खोऱ्यात आलेल्या महापुरानंतर ९ दिवस बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांना शुक्रवारी सुरक्षित आणि जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. त्रिशुली ३-ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात ही बचाव मोहीम फत्ते करण्यात आली. नेपाळ सैन्याच्या जनसंपर्क संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, कबीर महर्जन (वय ४५, यांत्रिक पर्यवेक्षक) आणि संजय शाह (वय ३०, फोरमन) अशी या सुखरूप सुटका झालेल्या कामगारांची नावे आहेत.
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने बाहेर काढल्यानंतर संजय शाह यांनी सांगितले की, पूर आला तेव्हा ते कंट्रोल रूममध्ये कार्यरत होते. सर्वांना सुरक्षित बाहेर काढणे ही त्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी इतरांना पळून जाण्यास सांगितले. मात्र, सर्वांना बाहेर पाठवेपर्यंत खूप उशीर झाला आणि ते स्वतः अडकले.
बोगद्यात अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता शाह यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आसपासच्या ३-४ लोकांशी आवाज देऊन संपर्क साधू शकत होतो. बोगदा खूप लांब असल्याने आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने काही लोक आणखी खोलवर अडकले असण्याची भीती आहे, असे ते म्हणाले.
माझ्या नवऱ्याला दुसरा जन्म मिळाला
नेपाळ लष्कराचे प्रवक्ते राजाराम बस्नेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कबीर महर्जन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हेलिकॉप्टरने काठमांडू येथील नेपाळ आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर संजय शाह यांच्यावर नुवाकोट येथील त्रिशुली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कबीर महर्जन यांची पत्नी हिरा शोभा यांनी अत्यंत भावुक होत सांगितले, माझ्या नवऱ्याला दुसरा जन्म मिळाला आहे. गेल्या नऊ दिवसांत झोप उडाली होती, पण ते परत येतील असा आम्हाला विश्वास होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून बचाव कार्य करणाऱ्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते.
६०० हून अधिक बेपत्ताच
बोगद्याच्या आतून लोकांचे आवाज ऐकू आल्यानंतर नेपाळ लष्कर आणि सशस्त्र पोलीस बलाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने शोधमोहीम तीव्र केली होती. दरम्यान, 'इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ नेपाळ'नुसार, ११ जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे ६०० हून अधिक लोक अजूनही गायब आहेत. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिम-खडक कोसळल्याने आलेल्या या महापुरात आतापर्यंत १,२५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४,७०० हून अधिक नागरिक अजूनही लापता आहेत. लष्कराकडून युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू आहे.
नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,२९५ वर
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण प्रलयकारी महापुरातील मृतांचा आकडा शुक्रवारी १,२९५ वर पोहोचला आहे. पूरग्रस्त भागांतून सातत्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आठ जिल्ह्यांतून १,२९३ मृतदेह हाती आले आहेत. शुक्रवारी काठमांडूतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारादरम्यान आणखी दोन बाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूसख्या १,२९५ झाली आहे.
भारताचे सहकार्य
सुरक्षा दलांच्या संयुक्त कमांडद्वारे अजूनही गायब असलेल्या अंदाजे ५,००० लोकांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत तब्बल १३,०९३ नागरिकांना पूरग्रस्त भागांतून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या संकटकाळात भारताने नेपाळला मदतीचा हात पुढे केला आहे. गुरुवारी रात्री भारताकडून २१.५ टन मदत साहित्य घेऊन सहावे आणि सातवे विशेष विमान (सी-१३०जे) काठमांडूमध्ये दाखल झाले. नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या साहित्यात फॉरेन्सिक किट्स आणि वैद्यकीय पुरवठ्याचा समावेश आहे.