काठमांडू : नेपाळमधील हिंसाचाराच्या उद्रेकानंतर तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी अंतरिम सरकारचे नेतृत्व कोण करणार, याबाबतचा तिढा गुरुवारीही कायम होता. घटनेच्या चौकटीत राहून आपण या तिढ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असून जनतेने शांतता पाळावी, असे आवाहन राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी केले आहे.
अंतरिम सरकार स्थापनेसाठीच्या हालचाली वेगवान झाल्या असतानाच काठमांडू आणि देशाच्या अन्य भागातील जनजीवन शांत होते. देशातील संवेदनक्षम ठिकाणी लष्कर गस्त घालत असून दोन दिवस झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३४ वर पोहोचली आहे.
लष्कराचाही दुजोरा
लष्कराने गुरुवारी काठमांडू खोऱ्यातील तीन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेशांना मुदतवाढ दिली. घटनेच्या चौकटीत राहून आपण राजकीय तिढा सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे लष्कराच्या संरक्षणात असलेले राष्ट्रपती पौडेल यांनी म्हटले आहे. आपण शक्य तितक्या लवकर यामधून मार्ग काढू, असे आवाहन त्यांनी सर्वपक्षीयांना केले आहे. विविध नेत्यांच्या नावांबाबत चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला लष्करानेही दुजोरी दिला आहे.
बाजारपेठांमध्ये गर्दी
दरम्यान, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागताच बाजारपेठा, दुकानांमध्ये नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रस्त्यावरही वाहनांची तुरळक प्रमाणात ये-जा सुरू होती. गुरुवारी जारी करण्यात आलेली संचारबंदी शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कायम आहे.
चार नावांची चर्चा
सरकारविरोधी आंदोलन पुकारणाऱ्या ‘जेन-झेड’च्या प्रतिनिधींनी गुरुवारी लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली, मात्र अंतरिम सरकारचे नेतृत्व कोण करणार याबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की, काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा, नेपाळ विद्युत प्राधिकरणाचे माजी सीईओ कुलमन घीशिंग आणि धारणचे महापौर हरका सांपांग यांच्या नावांचा विचार सुरू आहे.
१५ हजार कैदी पसार
नेपाळमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून देशातील २५ कारागृहांमधून जवळपास १५ हजार कैद्यांनी पलायन केले आहे. फरार कैद्यांपैकी ६० कैद्यांना भारत आणि नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र सीमा दलाकडून पकडण्यात आले असून सर्व कैद्यांना भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या चौक्यांवर ठेवण्यात आले आहे. नेपाळच्या जेलमधून फरार झालेल्या कैद्यांपैकी २२ कैद्यांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे, तर दहा कैद्यांना बिहारमधून ताब्यात घेण्यात आले आहे. तर तीन जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
आम्ही जागल्याचे काम करणार
‘जेन-झेड’ गटाच्या काही प्रतिनिधींनी काठमांडूमध्ये पत्रकार परिषद घेतली. संसद बरखास्त करावी आणि जनतेच्या इच्छेचे प्रतिबिंब असेल अशी घटनादुरुस्ती करावी, असे या प्रतिनिधींनी म्हटले आहे. आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी आमचा कोणीही वापर करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही या गटाने दिला आहे. ही नागरी चळवळ आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणीही राजकारण करू नये, असे गटाचे नेते म्हणाले. आम्हाला सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही, आम्ही जागल्याचे काम करू, असेही काही नेत्यांनी स्पष्ट केले.