
काठमांडू : हिंदू राष्ट्र, राजेशाहीसाठी नेपाळमध्ये हिंसाचार सुरू झाला असून ठिकठिकाणी जाळपोळ सुरू झाली आहे.
राजेशाही आणि हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी शुक्रवारी राजधानी काठमांडूमध्ये सुरक्षा दल आणि राजेशाही समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. आंदोलकांनी अनेक घरे, इमारती आणि वाहनांना आग लावली, याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या.
हे आंदोलन सुरुवातीला शांततापूर्ण सुरू होते, पण अचानक आंदोलकांनी पोलीस बॅरिकेडिंग हटवल्यामुळे वाद वाढला आणि या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष झाला. हिंसक निदर्शनांनंतर नेपाळच्या गृह मंत्रालयाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिनकुणे, सिनामंगल आणि कोटेश्वर भागात संचारबंदी लागू केली आहे. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळी लष्कराला रस्त्यावर उतरवण्यात आले आहे.
राजेशाही समर्थकांच्या रॅलीत नेपाळला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीत आंदोलकांच्या हातात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक मोठे पोस्टरही दिसले, ज्यामध्ये त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक दाखवले होते.
सकाळपासून संयुक्त आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. आंदोलक तिनकुणे परिसरात जमा झाले, मात्र गर्दी वाढल्याने परिस्थिती बिघडू लागली. आंदोलकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून त्या पेटवून दिल्या. सुरक्षा कठडा तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली. आंदोलकांनी सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यां फोडल्या.
नवराज सुबेदी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आंदोलन समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला वादग्रस्त व्यापारी दुर्गा प्रसादी आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते राजेंद्र लिंगदेन यांनी पाठिंबा दिला होता. नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र आणि घटनात्मक राजेशाहीत रूपांतरित करावे, अशी समितीची मागणी आहे. अनेक उजव्या विचारसरणीचे गट या चळवळीला पाठिंबा देत आहेत. नेपाळच्या सेक्युलर होण्याच्या निर्णयावर काही वर्ग नाराज आहेत.