ॲमस्टरडॅम : सगळे जग १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन दिनानिमित्त आपापल्या जोडीदाराबरोबर आयुष्यभर साथसंगतीच्या आणाभाका घेत असतानाच नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान द्रायस व्हॅन आग्त आणि त्यांच्या पत्नी युजीन यांनी हातात हात गुंफत ईच्छामरणाद्वारे जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त आले आहे. दोघांचेही वय ९३ वर्षे होते आणि दोघांनाही आरोग्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या कायदेशीर पर्यायाचा अवलंब केला.
द्रायस व्हॅन आग्त १९७७ ते १९८२ या काळात नेदरलँड्सचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांनी युरोपीय महासंघाचे (ईयू) जपान आणि अमेरिकेतील राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. गेली अनेक दशके युरोपच्या सार्वजनिक जीवनात द्रायस व्हॅन आग्त आणि युजीन दांपत्य अत्यंत अदबशीर रुबाबात आणि लोभसपणे वावरत होते. अनेक कार्यक्रमांत दोघेही एकत्र वावरताना दिसायचे. ते दोघे शानदार कारमधून प्रवास करत असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिक रांगा लावून त्यांचे स्वागत करायचे आणि आग्त दांपत्यही तितक्याच प्रेमभराने कारच्या खिडकीतून हात हलवून नागरिकांच्या अभिवादनाचा स्वीकार करत असे. मतदानाच्या दिवशी दोघेही एकत्रितपणे मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावतानाची छायाचित्रे युरोपीय वर्तमानपत्रांच्या वाचकांना परिचयाची झाली होती.
राजकीयदृष्ट्या आग्त यांची विचारसरणी पुराणमतवादी असली तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उदारमतवादी उपक्रमांना मदत केली होती. त्यांचा पॅलेस्टिनी संघटनांना पाठिंबा होता. आजवरच्या युद्धांत मरण पावलेल्या पॅलिस्टिनी नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २०१९ साली आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांना अचानक मेंदूतील रक्तस्रावाचा त्रास झाला. त्या दुखण्यातून ते कधीच पूर्णपणे सावरले नाहीत. त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावतच गेली. त्यांच्याबरोबर त्यांची आयुष्यभराची सहचारिणी युजीन यांनीही धसका घेतला आणि त्यांचीही तब्येत बिघडत गेली. अखेर जनतेच्या या लाडक्या दांपत्याने नेदरलँड्समधील ईच्छामरणाच्या कायद्याचा आधार घेत शांततेने आणि एकत्रितपणे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
जोडीने ईच्छामरणाची सोय
नेदरलँड्समध्ये २००२ सालापासून कायदेशीररीत्या ईच्छामरण किंवा दयामरणाला (युथनेशिया) परवानगी देण्यात आली. त्यासंबंधी बाबींची पूर्तता करण्यासाठी रिजनल युथनेशिया रिव्ह्यू कमिटीज स्थापन करण्यात आल्या. एनव्हीव्हीईसारख्या संस्था त्यासंबंधी जागृती करत आहेत. साधारण १८ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या नेदरलँड्समध्ये नागरिक आता वाढत्या संख्येने हा पर्याय वापरू लागले आहेत. सन २०२० मध्ये ८,७२० नागरिकांनी ईच्छामरण स्वीकारले होते. आता दांपत्याला एकत्र मरणाचाही (ड्युओ युथनेशिया) पर्याय देण्यात आला आहे. २०२० मध्ये १३ जोडप्यांनी त्याचा स्वीकार केला. सन २०२२ मध्ये २९ डच दांपत्यांनी जोडीने ईच्छामरण स्वीकारले.