

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या परदेशी विद्यार्थी आणि पत्रकारांच्या व्हिसाच्या कालावधीवर कडक मर्यादा घालणाऱ्या नव्या नियमांना अमेरिकेतील एका प्रांतीय न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या नियमांची अंमलबजावणी सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी मॅसॅच्युसेट्स जिल्हा न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. यामुळे भारतासह जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या नव्या धोरणामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षण प्रणालीचे "विनाशकारी" नुकसान होऊ शकते असे मत व्यक्त न्यायालयाने व्यक्त केले. हा नियम देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचा अमेरिकन सरकारचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. जुलै महिन्यात अंतिम करण्यात आलेल्या या नव्या नियमानुसार, विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसासाठी जास्तीत जास्त ४ वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. तर पत्रकारांच्या व्हिसासाठी २४० दिवसांची (सुमारे ८ महिने) मर्यादा ठेवण्यात आली होती. चीनच्या पत्रकारांसाठीही मर्यादा फक्त ९० दिवसांची करण्यात आली होती. हे नवे नियम मंगळवारपासून लागू होणार होते.