

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२० च्या दिल्ली दंगलीप्रकरणी जवळपास पाच वर्षांपासून तुरुंगात असलेला विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालिद याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळत असल्याचे समोर आले आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी उमर खालिदसाठी एक भावनिक पत्र लिहून, “आम्ही सगळे तुझ्याबद्दल विचार करत आहोत,” असे म्हटले आहे.
हस्तलिखित पत्र (दिनांक नाही) उमर खालिदच्या सहकारी बानो ज्योत्स्ना लाहिरी यांनी गुरुवारी सोशल मीडियावर (X) शेअर केले. न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून ममदानी यांचा मध्यरात्री शपथविधी झाला, त्यानंतर हे पत्र सार्वजनिक झाले. पत्रात ममदानी यांनी लिहिले आहे, “प्रिय उमर, कटुतेविषयी आणि ती भावना स्वतःला गिळंकृत करू देऊ नये हे किती महत्त्वाचं आहे, याबाबतचे तुझे शब्द मला वारंवार आठवतात. तुझ्या आई-वडिलांना भेटून आनंद झाला. आम्ही सगळे तुझ्याबद्दल विचार करत आहोत.”
उमरच्या वडिलांनी घेतली ममदानींची भेट
खालिदचे वडील सय्यद कासिम रसूल इलियास यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला खालिदच्या बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेला गेले असताना, कुटुंबाने मामदानी यांची भेट घेतली होती. “महापौरपदाची नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी वेळ मागितला होता. त्यांनी सुमारे अर्धा तास आम्हाला भेट दिली. उमरच्या कारावासासह अनेक विषयांवर चर्चा झाली,” असे इलियास यांनी सांगितले. “उमरच्या प्रकरणातील घडामोडी, तुरुंगातून लिहिलेली पत्रे याबाबतही त्यांना माहिती आहे, असे त्यांनी सांगितले,” असेही ते म्हणाले.
अमेरिकेच्या चार खासदारांचे उमरसाठी पत्र
इलियास यांनी पुढे सांगितले की, त्यांनी अमेरिकेतील डेमोक्रॅट खासदार जेमी रास्किन यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. “उमरच्या अटकेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि पाठिंबा दिला,” असे इलियास म्हणाले. “हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी कुटुंबाला आशा असल्याचेही मी त्यांना सांगितले,” असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, रास्किन यांनी इलियास आणि त्यांच्या पत्नींसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. जेमी रास्किन यांच्यासह अमेरिकेतील आणखी तीन खासदारांनी ३० डिसेंबर रोजी भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांना पत्र लिहून उमर खालिदच्या दीर्घकालीन कोठडीबाबत चिंता व्यक्त केली होती. पाच वर्षांपासून जामीन नाकारण्यात आल्याने “खटल्यापूर्वीच दिली जाणारी ही वागणूक स्वतःतच शिक्षेसारखी आहे,” असे या खासदारांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेल्या उमर खालिदला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. दिल्ली दंगली भडकावल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करत त्याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप खालिदने सातत्याने फेटाळले आहेत. बहिणीच्या लग्नासाठी त्याला गेल्या डिसेंबरमध्ये तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, बानो ज्योत्स्ना लाहिरी यांनी या दीर्घकालीन कोठडीवर टीका करत, “ही दीर्घ कारावासाची प्रक्रिया स्वतःतच अन्यायकारक आहे आणि म्हणूनच या प्रकरणाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले आहे,” असे म्हटले आहे.