न्यूयॉर्क टाइम्सचा ओपनएआय, मायक्रोसॉफ्टविरुद्ध खटला; कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप, भरपाईची मागणी

मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय या कंपन्यांनी त्यांचे चॅटबॉट्स विकसित करताना द न्यूयॉर्क टाइम्सचा भरपूर मजकूर विनापरवाना वापरला
न्यूयॉर्क टाइम्सचा ओपनएआय, मायक्रोसॉफ्टविरुद्ध खटला; कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप, भरपाईची मागणी
PM

न्यूयॉर्क : चॅटजीपीटी या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या चॅटबॉटची निर्मिती करणारी ओपनएआय ही कंपनी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्याविरुद्ध द न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकेतील न्यायालयात खटला भरला आहे. या कंपन्यांनी त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारीत उत्पादनांची निर्मिती करताना वर्तमानपत्राचा मजकूर मोठ्या प्रमाणावर वापरला. त्यासाठी वर्तमानपत्राची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही आणि त्याद्वारे कॉपीराइट कायद्याचा भंग केला, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. त्यासाठी टाइम्सने या कंपन्यांकडून मोठ्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच या कंपन्यांनी वर्तमानपत्राचा मजकूर वापरणे थांबवावे आणि यापूर्वी वापरलेला मजकूर नष्ट करावा, असे आदेश देण्याची मागणीही न्यायालयाकडे केली आहे.

सध्या अनेक सॉफ्टवेअर कंपन्या एआयवर आधारीत उत्पादने आणि सेवा निर्माण करत आहेत. ओपनएआयचे चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्टचे को-पायलट (पूर्वीचे नाव बिंग) असे अनेक चॅटबॉट्स सध्या विकसित केले जात आहेत. हे चॅटबॉट्स वापरून बातम्या, निबंध, लेख, कथा, कविता, जाहिराती आदी मजकूर संगणकाकडून लिहून घेता येतो. तसेच गाणी रचता येतात, चित्रे काढता येतात. हे चॅटबॉट्स विकसित करताना त्यांना तशा प्रकारची पूर्वी उपलब्ध असलेली भरपूर माहिती पुरवावी लागते. त्यावरून त्यांचे ठोकताळे तयार होतात आणि नंतर आपण विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देऊ शकतात. आपल्याला हवी ती माहिती उलब्ध करून देऊ शकतात.

मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय या कंपन्यांनी त्यांचे चॅटबॉट्स विकसित करताना द न्यूयॉर्क टाइम्सचा भरपूर मजकूर विनापरवाना वापरला. मायक्रोसॉफ्टने ओपनएआय कंपनीतही मोठी गुंतवणूक केली आहे. या दोन कंपन्यांची एआयआधारीत उत्पादने गेल्या वर्षी जोरकसपणे बाजारात आली आणि त्यानंतर अल्पावधीत त्यांनी मोठी मजल मारली. या दोघांनीही द न्यूयॉर्क टाइम्सचा मजकूर अवैधपणे वापरला. त्यासाठी पैसे दिले नाहीत. मजकूर उभा करण्यासाठी आम्ही वार्ताहर, संपादक, छायाचित्रकार आणि एकुणच यंत्रणेवर मोठी गुंतवणूक केलेली असते. मात्र, या कंपन्या हा तयार मजकूर फुकट वापरतात. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होते, असे सांगत टाइम्सने त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. याउलट असोसिएटेड प्रेस (एपी) आणि जर्मनीचा अॅक्सेल स्प्रिंगर या वृत्तसंस्थांनी ओपनएआयबरोबर मजकूर भागीदारीसाठी रीतसर करार केले आहेत.

 गेम ऑफ थ्रोन्सच्या लेखकाचीही तक्रार

गेम ऑफ थ्रोन्स या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जॉर्ज आर. आर. मार्टिन यांनीही गतवर्षी ओपनएआय कंपनीवर कॉपीराइट कायद्याच्या भंगाबद्दल खटला भरला होता. कंपनीने चॅटजीपीटीची निर्मिती करताना गेम ऑफ थ्रोन्समधील मजकुराचाही विनापरवाना वापर केला होता. अशाच प्रकारे कॉपीराइट्सचे उल्लंघन केल्याबद्दल युनिव्हर्सल आणि अन्य काही संगीत कंपन्यांनी अँथ्रॉपिक नावाच्या एआयआधारीत चॅटबॉट बनवणाऱ्या कंपनीवर अमेरिकेतील न्यायालयात खटला भरला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in