लंडन : झेक प्रजासत्ताकाच्या संवैधानिक न्यायालयाने प्राग येथील तुरुंगात अटकेत असलेल्या भारतीय नागरिक निखिल गुप्ता याची अमेरिकेला प्रत्यार्पणाविरोधात केलेली याचिका फेटाळून लावली आहे. अमेरिकी भूमीवर गुरपतवंत सिंग पन्नू या खलिस्तानी अतिरेक्यावर कथित हत्येचा प्रयत्न केल्याचा त्यावर आरोप आहे. जानेवारीत झेक हायकोर्टाने गुप्ता याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याचा निर्णय दिला होता. गुप्ताचे प्रत्यार्पण करायचे की, नाही याचा अंतिम निर्णय न्यायमंत्री पावेल ब्लाझेक घेतील.
गुप्ता याला ३० जून २०२३ रोजी झेक प्रजासत्ताकातील प्राग येथे अटक करण्यात आली होती आणि सध्या त्यांना तेथे तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अमेरिकन सरकार त्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्यार्पणाविरुद्ध गुप्ता यांच्या याचिकेवर झेकच्या प्रजासत्ताकाच्या न्यायालयाने सुनावणी केली. प्रत्यार्पण रोखू शकतील अशा बाबींवर कनिष्ठ न्यायालयांनी योग्य विचार केला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हे प्रकरण राजकीय असल्याचा युक्तिवादही फेटाळला. त्यामुळे तक्रारकर्त्यासाठी झेक न्यायालयांसमोरील कार्यवाही समाप्त होते, असे तेथील न्यायालयाने म्हटले आहे.