Nobel Prize 2024 : जॉन हॉपफिल्ड, जेफ्री हिंटन यांना यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल

यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘एआय’चे गॉडफादर जेफ्री हिंटन यांच्यासह जॉन हॉपफिल्ड यांना जाहीर झाला आहे.
Nobel Prize 2024 : जॉन हॉपफिल्ड, जेफ्री हिंटन यांना यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल
एक्स (@NobelPrize)
Published on

न्यूयॉर्क : यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘एआय’चे गॉडफादर जेफ्री हिंटन यांच्यासह जॉन हॉपफिल्ड यांना जाहीर झाला आहे. कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

जॉन हॉपफिल्ड यांनी ‘असोसिएटिव्ह मेमरी’ विकसित केली आहे, जी प्रतिमा आणि इतर प्रकारच्या पॅटर्न्स साठवून ते पुन्हा तयार करू शकते. तर जेफ्री हिंटन यांनी डेटा स्वयंचलितपणे विश्लेषित करण्याची पद्धत शोधली, ज्यामुळे प्रतिमांमधील विशिष्ट घटक ओळखता येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात मशीन लर्निंगसाठी या न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो, ज्यामध्ये मानवी मेंदूची प्रेरणा घेतलेली आहे. हॉपफिल्ड आणि हिंटन यांनी १९८०पासून या कृत्रिम न्यूरल नेटवर्क्सवर महत्त्वाचे कार्य केले आहे.

नोबेल पारितोषिक ११ दशलक्ष स्वीडिश क्राऊन बक्षीस रकमेसह दिले जाते, एकापेक्षा जास्त विजेते असल्यास त्यांना विभागून रक्कम दिली जाते. भौतिकशास्त्रासाठीचा हा पुरस्कार रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे दिला जातो. अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने विज्ञान, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातील कामगिरीसाठी ते दिले जाते.

शक्तिशाली मशीन लर्निंगचा पाया

“यावर्षीच्या भौतिकशास्त्रातील दोन नोबेल पारितोषिक विजेत्यांनी भौतिकशास्त्राच्या साधनांचा वापर करून आजच्या शक्तिशाली मशीन लर्निंगचा पाया असलेल्या पद्धती विकसित केल्या आहेत,” असे पुरस्कार देणाऱ्या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. कृत्रिम न्यूरल नेटवर्कवर आधारित मशीन लर्निंग सध्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि दैनंदिन जीवनात क्रांती घडवत आहे.

logo
marathi.freepressjournal.in