नूर खान हवाई तळावर हल्ला झाला! पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची कबुली

भारताने १० मेच्या पहाटे नूर खान हवाई तळावर हल्ला केल्याची कबुली पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी दिली आहे. भारत-पाकदरम्यान चार दिवस चाललेल्या सशस्त्र संघर्षानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच पाकने ही कबुली दिली.
नूर खान हवाई तळावर हल्ला झाला! पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची कबुली
नूर खान हवाई तळावर हल्ला झाला! पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची कबुलीसंग्रहित छायाचित्र
Published on

लाहोर : भारताने १० मेच्या पहाटे नूर खान हवाई तळावर हल्ला केल्याची कबुली पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी दिली आहे. भारत-पाकदरम्यान चार दिवस चाललेल्या सशस्त्र संघर्षानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच पाकने ही कबुली दिली.

मे महिन्यातील संघर्षादरम्यान पाकने भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीची विनंती केली नव्हती, असे दार यांनी सांगितले. मात्र, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारतासोबत संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा त्यांनी केला.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले होते. या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस तीव्र चकमकी झाल्या. १० मे रोजी पाकिस्तानच्या ‘डीजीएमओ’ने प्रस्ताव दिल्यानंतर शस्त्रसंधी करण्यास भारत तयार झाला.

भारताने डागलेल्या ८० ड्रोनपैकी ७९ ड्रोन ३६ तासांत पाडण्यात आले. त्यानंतर भारताने १० मेच्या पहाटे नूर खान हवाई तळावर हल्ला केला. ज्यामुळे पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली, असे परराष्ट्र मंत्रीपदही सांभाळणाऱ्या दार यांनी सांगितले.

दार म्हणाले की, १० मे रोजी सकाळी ८.१७ वाजता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी त्यांना फोन केला आणि भारत शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचे सांगून पाकिस्तान त्यास सहमत होईल का, अशी विचारणा केली. ‘आम्हाला कधीच युद्धात जायचे नव्हते,’ असे दार यांनी नमूद केले.यानंतर सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल यांनी भारताशी संवाद साधण्यासाठी परवानगी मागितली आणि ‘त्यानंतर शस्त्रसंधीवर सहमती झाल्याची पुष्टी केली,’ असेही दार म्हणाले.

प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रश्नाचे निराकरण आवश्यक असल्याची पाकिस्तानची भूमिका दार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

logo
marathi.freepressjournal.in